महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग ११)

भाग १० वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432379.html


२. वाईट शक्तींचा त्रास आणि त्या संदर्भात ठेवायचे दृष्टीकोन

२ अ. जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा मानसिक स्तरावर विचार न करता त्याला जिज्ञासेने सामोरे जा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा !

श्री. शॉन क्लार्क : प.पू. गुरुदेव, कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व जिज्ञासूंना वाईट शक्तींच्या संदर्भात चलत्’चित्रे पहातांना पुष्कळ भीती वाटली. ही भीती मानसिक स्तरावरील होती कि वाईट शक्तींनी ती निर्माण केली होती ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : ही भीती मानसिक होती. ही चलत्’चित्रे पहातांना त्यांच्या मनात ‘हे जग असे असते का ? लोकांना वाईट शक्तींचा अशा प्रकारे त्रास होतो का ?’, अशी जिज्ञासा जागृत व्हायला हवी होती; मात्र तसे झाले नाही. याउलट यांच्यामध्ये शिकण्याची वृत्ती न्यून आणि भीतीचे प्रमाण अधिक होते. याविषयी एका संतांची कथा सांगतो. एक संत मृत्यूशय्येवर होते. मृत्यू जवळ येत असतांना त्यांनी प्रत्येक टप्याला ‘स्वतःला काय होत आहे ?’, याविषयी शिष्यांना सांगितले होते. हे संत स्वतःच्या मृत्यूच्या वेळीही शिकण्याच्या स्थितीत होते.

तुम्ही सर्वजण एक चलत्’चित्र पाहून घाबरलात. याउलट तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला हवे की, तुमची स्थिती त्या ध्वनीचित्र-चकतीमध्ये (‘व्हिडिओ’मध्ये) दाखवलेल्या साधकांसारखी नाही आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. मनात येणार्‍या अयोग्य प्रतिक्रिया नष्ट करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत अ २ पद्धत वापरली जाते. तुम्हाला अ २ पद्धतीने स्वयंसूचना कशा द्यायच्या, हे कार्यशाळेत शिकवले असेलच. तुम्ही कशाचा तरी वास घेतलात अथवा काहीतरी पाहिलेत आणि घाबरलात, तर त्याऐवजी तुमची प्रतिक्रिया ‘अरे वा ! येथे मला काहीतरी नवीन शिकायला मिळाले’, अशी असायला हवी. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया ही सकारात्मकच असायला हवी.

सौ. प्रेमा लूझ हेर्नाडेझ : त्या वेळी मला स्वतःला ‘वाईट शक्तींचा त्रास आहे का ? मला होणारा त्रास सौम्य आहे कि तीव्र स्वरूपाचा आहे ?’, हे जाणून घ्यायचे होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : मूलतः ही प्रतिक्रिया मानसिक होती कि आध्यात्मिक स्तरावरील होती, हे स्वतःला समजायला हवे. आपण एखाद्या नवीन अनुभवाला सामोरे जातो, तेव्हा काही वेळा मानसिक स्तरावर त्याची भीती वाटू शकते. त्यामुळे स्वतःचा अभ्यास करा. तुम्ही पुढील २ दिवस येथे आहात. या २ दिवसांत तुम्हाला हा अभ्यास करण्याची चांगली संधी आहे.

२ आ. वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांनी उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घेत साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत !

सौ. शरण्या देसाई : वाईट शक्तींच्या त्रासामुळे माझ्यातील कोणता स्वभावदोष किंवा अहंचा पैलू यांचे प्रकटीकरण होते, ते मला ओळखता येत नाही. मी त्याचे विश्‍लेषण कसे करू शकते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : मुळात ‘जे स्वाभाविक नाही, ते अस्वाभाविक आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. तुमच्या मनात जसे विचार असतील, तसे तुमचे आचरण असेल. सर्वसाधारणपणे तुमचे बोलणे किंवा वागणे नेहमीप्रमाणे नसेल, तर ‘वाईट शक्तींचा त्रास आहे’, असे समजावे. अशा वेळी तुम्ही त्याचे विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न करू नका; कारण तेव्हा वाईट शक्ती तुम्हाला चुकीची माहिती देईल. तुम्ही त्याचे विश्‍लेषण करायला गेलात, तेव्हा ती तुम्हाला ‘हे विचार माझेच (साधिकेचे) आहेत’, असे (चुकीचे) विचार देईल. त्यामुळे विश्‍लेषण करण्याऐवजी साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत. असे केल्याने वाईट शक्तीची शक्ती न्यून होईल. एखाद्या वेळी ‘हे विचार माझे आहेत कि वाईट शक्तींचे ?’, अशी शंका मनात आल्यास तुम्ही उत्तरदायी साधकांना विचारा. ते तुम्हाला लगेच सांगतील. सर्वसाधारण व्यक्तीच्या मनात येणारे विचार ‘योग्य आहेत कि अयोग्य ?’, हे जाणून घेण्यासाठी तिला मानसोपचार तज्ञाकडे जावे लागते. अध्यात्मात आपण साधनेत प्रगती केलेल्या साधकांना विचारायचे असते.

(क्रमशः)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग १२ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432895.html