६० व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यावर बहिष्कार घालूच शकत नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त गोमंतकीय

डॉ. प्रमोद सावंत

 पणजी, १७ डिसेंबर (वार्ता.) – गोवा शासनाने आयोजित केलेल्या गोवा मुक्तीदिन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ६० वा गोवा मुक्तीदिन सोहळा वर्षभर साजरा करण्याऐवजी हा निधी कोरोना महामारीच्या काळात अडचणीत सापडलेल्यांना आर्थिक साहाय्यासाठी वापरावा, या मागणीला अनुसरून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या विरोधी पक्षांनी या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे घोषित केले आहे. तसेच ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांनी ६० व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त गोमंतकीय ६० व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यावर बहिष्कार घालूच शकत नाही.’’

गोवा मुक्तीलढ्याचा इतिहास

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गोवा आगमनाविषयी अधिक माहिती देतांना पुढे म्हणाले, ‘‘गोवा मुक्तीदिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद २ दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे १९ डिसेंबरला दुपारी गोव्यात पोचतील. शासनाच्या सकाळी होणार्‍या ध्वजवंदन कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी होऊ शकणार नाहीत. ते गोव्यात आल्यानंतर प्रथम राजभवन येथे जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रपती, गोव्याचे राज्यपाल, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री हे आझाद मैदान येथे हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करतील आणि त्यानंतर दयानंद बांदोडकर मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमाला सर्वजण उपस्थिती लावणार आहेत. या सांस्कृतिक सोहळ्यात गोमंतकातील सुमारे १५० ते २०० कलाकार सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या वेळी गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. गोवा शासनाने ६० व्या गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याद्वारे गोव्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक भाग जगासमोर आणण्यात येणार आहे. गोवा मुक्तीलढ्याशी संबंधित विविध ऐतिहासिक स्मारकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.’’

गोवा मुक्तीलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार !

गोवा मुक्तीलढ्याचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्यात पुढील ६० वर्षांसाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ सिद्ध केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

जवाहरलाल नेहरूंमुळे गोव्याला स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या सूत्राविषयीची माहिती वर्षभराच्या कार्यक्रमांमधून मिळेल

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे गेाव्याल्या स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या एका विधानाला ‘दक्षिणायन अभियान’ने १६ डिसेंबर या दिवशी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत विरोध केला होता.

या पार्श्‍वभूमीवर  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘नेहरूंशी निगडित प्रकरणासमवेतच गोव्याच्या इतिहासाविषयीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे वर्षभर चालणार्‍या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमातून मिळणार आहेत.’’

मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठीच्या ‘लोगो’चे प्रकाशन

पणजी – गोवा शासन ६० वा गोवा मुक्तीदिन १९ डिसेंबर २०२० ते १९ डिसेंबर २०२१, असा वर्षभर साजरा करणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १७ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री निवासस्थानी एक ‘लोगो’ प्रसिद्ध केला आहे. या वेळी माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार (आय.ए.एस्.) आणि संचालक सुधीर केरकर यांची उपस्थिती होती.

 (सौजन्य : News Of Goa)

शासनाने गोवा मुक्तीदिन सोहळ्याच्या निमित्ताने लोकांकडून ‘लोगो’ मागितले होते. उत्कृष्ट ‘लोगो’साठी १० सहस्र रुपये पारितोषिक ठेवण्यात आले होते. या निमित्ताने १६४ अर्ज आले होते आणि यामधील गोठण, वेलींग, म्हार्दोळ येथील भावेश वेलींगकर यांनी सिद्ध केलेल्या ‘लोगो’ला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. हा ‘लोगो’ वर्षभराच्या कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे.