कुडाळ आगाराचे २० कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांची कुडाळ आगारावर धडक
|
कुडाळ – मुंबई येथे ‘बेस्ट’ परिवहन सेवेत कुडाळ आगाराचे ४८ कर्मचारी पाठवण्यात आले होते. ते १३ डिसेंबरला परत आल्यावर त्यांची तपासणी केली असता त्यांपैकी २० कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही ५ कर्मचार्यांचा कोरोनाविषयीचा अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे १७ डिसेंबरला मनसे आणि भाजप या पक्षांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कुडाळ आगारावर धडक देत संबंधितांना खडसावले. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापकाला घेराव घातला, तर मनसेने आंदोलन करत आगाराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले होते.
एस्.टी.च्या दायित्वशून्य कारभारामुळे कुडाळ तालुक्यात कोरोनाचे वाढते संकट ! – भाजपचा आरोप
भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पंचायत समिती सभापती श्रीमती नूतन आईर, नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह येथील एस्.टी. आगाराचे व्यवस्थापक यांना घेराव घालून खडसावले.
कुडाळ शहर कोरोनामुक्त होण्यासाठी जीव तोडून उपाययोजना करत आहेत; पण एस्.टी. व्यवस्थापनाच्या दायित्वशून्य कारभारामुळे कर्मचार्यांच्या जिवाला धोका आहेच; त्यासह तालुक्यात गावागावांत एस्.टी.च्या माध्यमातून कोरोना पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एस्.टी. कर्मचार्यांच्या वेतनाच्या नावाने तर बोंबच आहे, कर्मचार्यांच्या अगतिकतेचा अपलाभ घेत त्यांना वेठीस धरून त्यांना हवेतसे राबवण्याचे एस्.टी.चे क्रूर धोरण आहे. केवळ वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी एस्.टी.ची स्थानिक सेवा कोलमडवली जात आहे, असा आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी केला.
कुडाळमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढ होण्यास एस्.टी. प्रशासन उत्तरदायी ! – मनसे
कुडाळमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्यास एस्.टी.चे अधिकारी उत्तरदायी आहेत, असा आरोप करत मनसेच्या पदाधिकार्यांनी कुडाळ बसस्थानकाच्या अधिकार्यांना धारेवर धरले. जोपर्यंत याविषयी शासनाचा योग्य निर्णय येत नाही, तोपर्यंत एस्.टी. आगाराचे प्रवेशद्वार उघडणार नाही, अशी भूमिका मनसेच्या पदाधिकार्यांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. मनसेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तरी आंदोलन चालूच राहील, अशी चेतावणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपाध्यक्ष जगन्नाथ उपाख्य बनी नाडकर्णी आदी उपस्थित होते.