‘सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढवावी ?’, याविषयी पू. संदीप आळशी यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (१८.१२.२०२०) या दिवशी पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी ‘सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढवावी ?’, याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
पू. संदीप आळशी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘समष्टी साधना’ ही इतरांसाठी नाही. ती आपल्यासाठीच आहे. इतरांकडून शिकणे म्हणजे समष्टी साधना.’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१५.१२.२०२०) |
१. अभ्यास
‘आपण करत असलेली सेवा परिपूर्ण होण्यासाठी अभ्यास हा खूप महत्त्वाचा घटक आहे. सेवेतील चुका न्यून करण्यासाठी साधकांनी नियमितपणे अभ्यास करायला हवा. प्रतिदिन स्वतःच्या सेवांचे नियोजन करतांना अभ्यासासाठी विशिष्ट वेळ ठेवायला हवी. साधक स्वतःचे सेवेचे घंटे, सेवांची तातडी यांनुसार उत्तरदायी साधकांशी बोलून अभ्यासाची वेळ ठरवू शकतात, उदा. एखादा साधक दिवसभरात ७ – ८ घंटे संगणकीय सेवा करत असेल आणि त्याच्या सेवांची तातडी असेल, तर तो प्रतिदिन केवळ ३० मिनिटे अभ्यासासाठी ठेवू शकतो. अभ्यास प्रतिदिन होईल, असे पहावे. ग्रंथांच्या संदर्भातील संकलनाची सेवा करणारे साधक साधकांनी पूर्वी संकलित केलेल्या धारिकांचे वाचन करणे, शुद्धलेखन, व्याकरण आदींचा अभ्यास करणे, त्यांतील चुका अभ्यासणे, ग्रंथवाचन करणे, इतरांनी संकलित केलेले लेख वाचणे, दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून त्यातून चुका शोधणे इत्यादी प्रकरे अभ्यास करू शकतात.
सेवेला आरंभ करण्यापूर्वी साधकांचा अभ्यास अल्प पडतो. सेवा चालू करण्यापूर्वी ५ – १० मिनिटे विचार करून ‘आपल्याला सेवेच्या शेवटपर्यंत नेमके काय काय करायचे आहे ?’, हे पाहू शकतो. त्या वेळी ‘काय करायचे आहे आणि किती वेळात साध्य करायचे आहे ?’, याचा अभ्यास करावा.
२. एकाग्रता
ज्याप्रमाणे आध्यात्मिक उपाय परिणामकारक होण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते, त्याचप्रमाणे सेवा चांगली होण्यासाठीही सेवा करतांना मन एकाग्र असणे आवश्यक आहे. सेवा एकाग्रतेने झाल्यास सेवेतून चैतन्य मिळेल आणि साधना होईल; अन्यथा एकाग्रता नसल्याने त्रुटी राहून केवळ कार्य होईल. यासाठी साधक सेवेला आरंभ करण्यापूर्वी ५ – १० मिनिटे आवरण काढणे, भावपूर्ण प्रार्थना करणे इत्यादी उपाय करू शकतात. सेवा करतांना ‘दिवसभरात कोणत्या वेळेत आपण सेवा अधिक एकाग्रतेने करू शकतो ?’, याचाही अभ्यास करावा. त्यानुसार सेवांचे नियोजन करून कठीण सेवा त्या कालावधीत करण्याचे नियोजन करावे.
विचारांचे प्रमाण अधिक असल्यामुळे बर्याच साधकांची सेवा एकाग्रतेने होत नाही. अशा वेळी विचारांच्या मुळाशी जाऊन ते न्यून करण्यासाठी स्वयंसूचना देणे, स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, मनमोकळेपणाने बोलणे इत्यादी प्रयत्न करावेत.
(‘एका साधिकेच्या मनात अनावश्यक विचार येत असत. ते न्यून करण्यासाठी तिने पू. संदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे भावप्रयोग आणि ५ मिनिटे शिवाचा नामजप केला. त्यानंतर तिच्या मनातील अनावश्यक विचार न्यून झाले.’ – संकलक)
३. सेवेची गती
काळ पुष्कळ गतीमान आहे. त्याच्याशी जुळवून न घेतल्यास आपण मागे राहू. सेवेच्या आरंभी चिंतन करावे. त्याविषयी कुणाशी तरी बोलून घ्यावे. आत्मविश्वास न्यून असल्यास अभ्यास वाढवावा. साधनेत पुढे जायचे असेल, तर सेवेची गती वाढली पाहिजे.
३ अ. वेळ वाया न घालवणे : साधकांनी दैनंदिनी नियमितपणे लिहायला हवी. एका साधिकेची क्षमता असूनही ती क्षमतेचा वापर करत नव्हती; एका संतांनी तिला दैनंदिनी लिहायला सांगितली आणि ते तिची दैनंदिनी स्वतः पडताळून देत. त्यांनी तिला जेवणासाठी लागणारा कालावधीही न्यून करायला सांगितला.
आपण प्रत्येक मिनिट वाचवायला हवे. दैनंदिनी लिहिण्याचा उद्देश लक्षात घ्यायला हवा. ‘आपला वेळ नीट वापरला जात नाही’, असे वाटत असेल, तर स्वतःहून दैनंदिनी लिहायला हवी.
‘बोलण्यात आपला वेळ वाया जातो का ?’, हे पहावे. एखादा अबोल असेल, तर त्याने इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करावा; पण आपण सर्वांमध्ये मिसळत असू, तर मग सेवेला वेळ दिला पाहिजे.
३ आ. सेवा अचूक करणे : सेवेतील चुकांचे प्रमाण अधिक असेल, तर गती न्यून पडते. चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘चुका होऊ नयेत’, यासाठी पडताळणी सूची बनवावी. पडताळणी सूची हा केवळ आधार आहे. आपल्या वृत्तीतच पालट व्हायला हवा. परत परत होणार्या चुका फलकावर लिहिणे आणि त्यासाठी प्रायश्चित्त घेणे आवश्यक आहे.
४. भाव
भाव असेल, तर देवाचे साहाय्य मिळते. त्यासाठी प्रार्थना (सामूहिक आणि वैयक्तिक) करणे आणि शरणागतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सेवा करतांना मधे मधेही प्रार्थना केली पाहिजे. ज्याच्यात भाव आहे, त्याच्याकडून भावजागृतीसाठीचे प्रयत्न शिकावेत. सेवा करतांना कंटाळा आला, तर भावप्रयोग, नामजप, एखादे भजन ऐकणे असे करू शकतो.’
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |