महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग १०)

भाग ९. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431934.html


१. साधना

१ ओ. आध्यात्मिक प्रगती

१ ओ १. आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे !

सौ. श्‍वेता क्लार्क : सौ. सलोनी तिवारी या सध्या आश्रमात वास्तव्यास आहेत. त्या या वास्तव्याचा आध्यात्मिक लाभ करून घेण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करतात. त्यांना मोकळा वेळ असतो, तेव्हा त्या नामजप करतात. सध्या त्या पू. (सौ.) भावना शिंदे यांच्या खोलीत निवासाला आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले (पू. भावनाताई यांना उद्देशून) : तुम्ही यांच्याविषयी काही सांगा.

पू. (सौ.) भावना शिंदे : सलोनीताई आश्रमात आल्यापासून माझ्या खोलीत वास्तव्यास आहेत. त्या म्हणतात, ‘‘श्रीकृष्णाला अनुभवता आले नाही, तर मला पुष्कळ त्रास होतो.’’ त्यांनी मला विचारले, ‘‘माझी श्रीकृष्णाशी भेट होईल ना ?’’ हा प्रश्‍न विचारतांना सलोनीताईंच्या डोळ्यांत भावाश्रू आले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण असा विचार करत नाही. आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ईश्‍वरप्राप्तीची तळमळ असण्याला ८० टक्के महत्त्व आहे. ही तळमळ तीव्र असेल, तरच तुम्ही प्रगती करू शकता.

१ ओ २. जलद आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी साधकांनी ‘ईश्‍वराच्या अखंड अनुसंधानात असणे’
अत्यावश्यक आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही काही सांगा.

सौ. सलोनी तिवारी : मला केवळ ‘गुरुकृपा हि केवलम् शिष्यपरममङ्गलम् ।’, हेच ठाऊक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : याचा अर्थ ‘साधकांनी प्रथम गुरुकृपा संपादन करायला हवी. मगच त्यांची आध्यात्मिक प्रगती होते’, असा आहे. त्यांना इतर काहीही बोलायची आवश्यकता वाटत नाही. देव शब्दांच्या पलीकडे असतो. आपण प्रश्‍नोत्तरे अथवा अध्यात्माच्या विविध विषयांवर बोलतो, तेव्हा आपण आपला वेळ वाया घालवतो. मूलतः आपल्यात ईश्‍वरप्राप्तीची तळमळ असायला हवी आणि मनात कोणतेही प्रश्‍न अथवा शंका असायला नको. ईश्‍वराच्या अनुसंधानात रहायचे आणि त्याचाच विचार करायचा. साधनेच्या प्राथमिक टप्प्याला ईश्‍वर आणि साधना यांविषयी शंकानिरसन करून घेणे आवश्यक आहे. तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतात आणि अध्यात्माविषयी दृढ श्रद्धा निर्माण होते, तेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती जलद होते. तुमच्या मनात कोणतेही प्रश्‍न उरलेले नाहीत, तसेच तुम्हाला काहीही सांगायचे नाही. तुम्ही तो टप्पा ओलांडला आहे. तुम्हाला केवळ ईश्‍वराच्या अनुसंधानात रहायचे आहे. फार छान ! तुम्ही या सर्वांसाठी आदर्श उदाहरण आहेत.

१ ओ ३. ‘आपली आध्यात्मिक प्रगती होत आहे कि नाही ?’, हे इतरांना ठरवू द्या !

कु. मिल्की अगरवाल : स्वतःची आध्यात्मिक प्रगती होत आहे, हे कसे ओळखायचे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘स्वतःची आध्यात्मिक प्रगती होत आहे कि नाही ?’, हे आपण स्वतः ठरवू नये; कारण त्याचा निर्णय स्वतःच्या बाजूने असेल. त्यामुळे ‘तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे कि नाही ?’, हे इतरांना ठरवू द्या. ‘आपल्याला कोणता आजार आहे ?’, याचे निदान आपण स्वतः करू शकत नाही. त्याचे निदान आधुनिक वैद्यच करू शकतात. अध्यात्मातही तसेच आहे. असे असले, तरी ‘पूर्वी माझ्यात पुष्कळ स्वभावदोष होते आणि ते उणावत आहेत, त्यांची तीव्रता न्यून होत आहे’, हे मानसिक पातळीवर आपल्या लक्षात येऊ शकते.

(क्रमशः)

भाग ११ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432560.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक