डिंगणे येथील कोतवालाच्या आत्महत्येच्या प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
सावंतवाडी – तालुक्यातील गावठणवाडी, डिंगणे येथील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी डिंगणे येथील नितीन श्रीधर सावंत आणि चंद्रकांत गणपत सावंत या दोघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.
तालुक्यातील गावठणवाडी, डिंगणे येथील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांनी १४ डिसेंबरला कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे उपचार चालू असतांना १५ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाईक यांची मुलगी कु. ऐश्वर्या हिने वडिलांच्या मृत्यूप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ‘डिंगणे येथे करण्यात आलेल्या माती उत्खननाच्या प्रकरणी चौकशी झाल्यावर या दोघांनी वडिलांना ‘उत्खननाविषयी तक्रार का केली’, असे विचारल्याने भीतीने वडिलांनी आत्महत्या केली’, असे कु. ऐश्वर्या हिने तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी नितीन श्रीधर सावंत आणि चंद्रकांत गणपत सावंत या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी बजावली.