शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावरील माहिती आवेदनात ‘ब्राह्मण – ब्राह्मणेतर’ असा उल्लेख

चूक त्वरित पालटण्यासाठी परशुराम सेवा संघाचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

श्री. विश्‍वजित देशपांडे

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येते. पूर्वी या माहिती आवेदनात सर्व जातींचा उल्लेख होता; परंतु आता त्या आवेदनात ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मणेतर’ असा उल्लेख आढळला आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट असून झालेला चुकीचा उल्लेख त्वरित पालटण्यात यावा, अशी मागणी परशुराम सेवा संघाने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्रही देण्यात आले आहे.

या संदर्भात परशुराम सेवा संघाचे श्री. विश्‍वजित देशपांडे यांनी अधिक माहिती दिली आहे की…

१. ‘सरल’ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता आदी माहिती भरण्यात येते. त्यातील ‘जात’ या रकान्यात पूर्वी सर्व जातींचा उल्लेख असायचा; परंतु गेल्या काही दिवसांत या रकान्यात पालट झाला असून केवळ ‘ब्राह्मण किंवा इतर’ असे दोनच पर्याय दिसत आहेत. असे का केले असावे ? हे अनाकलनीय आहे. यामुळे ‘ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वेगळे आहेत’, असा चुकीचा संदेश जातो.

२. ‘आधीच जातीयद्वेषाचा बळी ठरलेल्या ब्राह्मण समाजाला आता शासनही सापत्न वागणूक देणार आहे का ?’, असा प्रश्‍न आमच्या मनात निर्माण झाला आहे.

३. विद्यार्थ्यांची अशी विभागणी करून काय साध्य होणार आहे ? भविष्यात या विभागणीमुळे ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट वागणूक देण्याचा शासनाचा मानस आहे का ? असे अनेक गंभीर प्रश्‍न यामुळे निर्माण झाले आहेत. तरी या संदर्भात त्वरित लक्ष घालून हा चुकीचा उल्लेख पालटण्यात यावा, अशी विनंती आम्ही केली आहे.