श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन कोरोना माझ्या पायाशी घेईन आणि त्याला नष्ट करीन !
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी, कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) – भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल, गार्हाण घालल. कोरोना माझ्या पायाशी घेईन, त्याचं गाडप (नष्ट) करीन. ३३ कोटी देवांच दरबार बंद पडल्यात. खडकाचा दरबार (जिथे यात्रा होते, जिथे भाकणूक होते ते ठिकाण) उघडा आहे. चालू राहील, ही धर्माची गादी हाय. ‘धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा’, असे आशीर्वचन श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाने भक्तांना दिले. ही भाकणूक ३ नोव्हेंबर २०२० या दिवशी पहाटे ४.१५ वाजता पू. भगवान वाघापुरे (डोणे) महाराज यांच्या माध्यमातून सांगण्यात आली.
या भाकणुकीत ‘भगवा झेंडा राज्य करील, शत्रूराष्ट्र चीन भारतावर आक्रमण करील, भारत-पाक सीमेवर रण चालेल, पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल, स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशावरून पुसून जातील’, असे पुढे सांगण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांमुळे या वेळी आप्पाचीवाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्वर, कोल्हापूर आदी गावांतील भक्तगण अल्प संख्येत उपस्थित होते.
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय !
(ही भाकणूक कशा स्वरूपाची असते, हे सर्वांना कळावे, यासाठी ती येथे आहे तशी प्रसिद्ध करत आहोत. या भाकणुकीचा सर्वसाधारण अर्थ वाचकांना समजावा, यासाठी त्यातील काही वाक्यांचा अर्थ कंसामध्ये दिला आहे. – संपादक)
(भाग ३)
(संकलक : सेवेकरी श्री. वीरभद्र विभूते आणि श्री. राजेंद्र विभूते, कुर्ली, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव.)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/431919.html
१७. ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं बघल ।
बारा वर्षाचं बालपण खेळत राहील. चोवीस वर्षांचं तरुणपण काबाडकष्ट करील. पस्तीस वर्षांचं म्हातारपण येईल. (सध्या मनुष्याची जीवनशैली पालटली आहे. पूर्वी लोक १०० वर्षे जगत. आता व्यायाम न करणे, शरिराला पुरक नसलेला आहार खाणे, व्यसनाधीनता यांमुळे शरीर पूर्वीसारखे टिकत नसून मनुष्यास ३५ व्या वर्षीच म्हातारणपण येत आहे.) मनुष्याला बुद्धी अधिक आयुष्य कमी. जग दुनियेत एक मोठ नवाल होईल. बहीण-भावाच प्रेमप्रकरण चालंल. भाऊ-बहिणीचं लग्न-कार्य चालल. भाऊ-बहिणीच्या नात्याला कलंक लागंल. काळीमा फासल. भावाला बहीण ओळखेना. सासर्याला सून ओळखेना. धर्म बुडून गेलायं. सत्य फासावर गेलया. डोंगराएवढं पाप, दोर्याएवढं पुण्य जगात शिल्लक राहिलंय. दोर्याच्या आधारावर डोंगर तरलाया. (सन्मार्गाने चालणारी माणसे अल्प आहेत. अशा अल्प माणसांच्या आधारावरच हे जग चालू आहे.) शेषाच्या फणीवर धरित्रीमाता हाय. पृथ्वीचा करार संपत आलाय (पृथ्वीचा विनाशकाळ जवळ आला आहे.) ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं बघल.
१८. शेतीसाठी देशात खून पडतील ।
घरातील लक्ष्मी दडून बसलीया. रानातील लक्ष्मी पळून खेळायला लागलीया. (हे शेतीच्या संदर्भात आहे. एखाद्या वर्षी एखाद्या शेतात चांगले पिक येते, तर दुसर्या वर्षी ‘तसे पिक येईलच’, असे नाही. म्हणजे शेती कायमस्वरूपी चांगलीच असेल असे नाही, एखाद्या वर्षी लाभ, तर एखाद्या वर्षी तोटा असे असेल.) कागदाचा घोडा मनुष्याला खुळ लावलं. (नोटाबंदीनंतर लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि लोकांना वेड लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली.) शेतीसाठी देशात खून पडतील. काळी कांडी (शेती) पोटाशी धरावी जतन करावी. एक औत चौघात होईल. (‘भूमीची मशागत करण्यासाठीचे एक अवजार म्हणजे औत (नांगर) होय. हे औत पूर्वी जवळपास प्रत्येक शेतकर्याकडे होते. आता यांत्रिक शेती होत असल्याने अनेकांकडे औत नाहीत.’ – संकलक) कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय. (पिकांना भाव न मिळणे, बैल उपलब्ध न होणे, सतत पालटणारे हवामान, तसेच अन्य अनेक गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.) बसव्याच शिंगाट सोन्याचं होईल. (बैलांची संख्या अल्प होऊन बैल सोन्यासारखे दुर्मिळ झाले आहेत आणि महागही झाले आहेत.)
जग दुनियेत तीन राजे आहेत. मेघराजा, बसवराजा, कुळंबी (शेतकरी) राजा. कुळंबीच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे. मेघराजाची तुम्ही वाट बघाला. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा. धर्माचा पाऊस, कर्माचे पीक. पावसाअभावी ऋतुमान बदलत जाईल.
१९. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा !
जगाच भविष्य चाललय. कोल्हापूरच्या देवीला मोठ संकट पडलया, रात्री बाराच्या टाइमाला (वाजता) तिच्या नेत्रातून पाणी पडतया. (लोकांकडून होणारे पापकर्म, सद्य:परिस्थिती, दुराचार, अनाचार यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीलाही वाईट वाटत असून तिच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत.)
परमेश्वर तिचा निवाडा करील. भाकरीवरील भाजी हाय. सांभाळून खावा. (भाकरी-भाजी खातांना भाजी अल्प असल्यास शेतकरी भाजी पुरवून खातात. त्याचप्रकारे आता एखादी गोष्ट उदा. पेट्रोल, डिझेल, पाणी हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे; म्हणून मनुष्याने कसेही वापरू नये. त्याचा काटकसरीने वापर करावा. भविष्यात या गोष्टींची टंचाई होऊ शकते.) ह्यो बोराटीचा काटा हाय. (माझ्या सेवेत असतांना भक्ती करतांना ती योग्य प्रकारे करा. माझ्याकडे येतांना नीती-नियमाने रहा. मनुष्याला माझे ऐकायचे नसेल, कसेही वागायचे असेल, तर माझ्याकडे येऊ नये अन्यथा जसा काटा टोचतो, त्याप्रमाणे माझ्याकडून शासन (शिक्षा) मिळेल.)
कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेटतील. सातार्याच्या गादीवर फूलं पडतील. (हे भविष्य जुन्या काळातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्यांमध्ये वाद निर्माण झाले. त्या वेळी सातारा येथील गादी अधिकृत घोषित होईल; म्हणजेच त्या गादीवर फुले पडतील’, असे देवाला सांगायचे आहे. – संकलक)
काळ्या खडकाच्या लाह्या उडतील. खडकाच्या माळाला. धडका मारशीला. (यापुढील काळात कदाचित् मनुष्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे देव इथून निघून जाईल आणि मग या खडकावर डोके आपटून घेण्याविना कोणताच पर्याय मनुष्यासमोर नसेल. याचा दुसरा अर्थ असा की, कदाचित् संकटावर संकटे इतकी येतील की, मनुष्याला सतत त्या खडकावर डोके आपटून घ्यावे लागेल ! – संकलक) छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा ! छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी जन्माला येणार आहेत.
२०. भगवा झेंडा राज्य करेल ।
भगवा झेंडा राज्य करेल. तिरंगा झेंडा भंगला जाईल. नऊ खंड पृथ्वी दहावा खंड काशी, दहाव्या काशीत माझ दफ्तर हाय. करवीर काशीत माझा ठिकाणा आहे. (नऊ खंड एका बाजूला असून दहावा खंड काशी एका बाजूला आहे. त्या काशीत माझा विद्याभ्यास झाला. त्याचप्रकारे कोल्हापूर विभागात माझे वास्तव्य आहे.) हालसिद्धनाथाची करशीला चाकरी, तर खाशीला भाकरी. गर्वान वागू नये. गर्वान वागशीला, तर फसून जाशीला. गर्वाच घर खाली आहे. मी थोरला, तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. गोसाव्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागाव.
२१. तुमच दु:ख माझ्या पायाशी घेईन ।
आलोय तुम्हाला सांगत, आलोय. खाशीला थोबाडीत खाशीला. हे मुंबई हायकोर्ट आहे. न्यायनिवाडा करायला. विषाचा पेला हाय. ह्यो बोराटीचा काटा हाय. खैराचा इंंगोला हाय. लई वाईट घालीन घालीन कांबळ्याचा शेव घालीन. (माझ्याजवळ येतांना पवित्र मनाने यायला हवे. तुम्ही अपवित्र मनाने माझ्याजवळ याल, तर शासन (शिक्षा) केले जाईल.) तुमच दु:ख माझ्या पायाशी घेईन. माझ्या झोळीतील तुम्हाला रिद्धि-सिद्धि देईन. गावातील इडा-पिडा दूर करीन. बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन. पांढरीची राखण करीन. छाया धरीन ! (आप्पाचीवाडी-कुर्ली या ठिकाणी श्री राजगिरी महाराजांची समाधी आहे. ती समाधी ११ व्या शतकातील आहे. या ठिकाणी १६/१७ व्या शतकात जेव्हा श्री हालसिद्धनाथ आले, तेव्हा त्यांनी राजगिरी महाराजांशी सूक्ष्मातून संवाद साधला. नाथांनी ‘मला समाधीसाठी ही जागा योग्य वाटत आहे, तरी चालेल का ?’ असे राजगिरी महाराजांना सूक्ष्मातून विचारले. तेव्हा राजगिरी महाराजांनी त्यांना अनुमती दिली; मात्र या पंचक्रोशीतील जनता म्हणजेच कुर्ली परिसरातील भक्तांचे रक्षण करण्याचे वचन घेतले. त्यामुळे प्रत्येक भाकणुकीत देव ‘पांढरीची राखण करीन’, असे सांगतात.)
(समाप्त)
भाकणुकीचा अर्थ टंकलेखन करतांना आलेल्या अडचणी आणि झालेले त्रास !
‘या भाकणुकीचा अर्थ श्री. वीरभद्र विभूतेकाका मला दूरभाषवरून सांगत आणि मी ते थेट संगणकावर टंकलेखन करत असे. यातील दुसर्या भागाचे म्हणजे ६ ते १७ पर्यंतची सूत्रे टंकलेखन करतांना काकांनी मला अर्थ सांगण्यास प्रारंभ केल्यावर संगणकाची गती अचानक हळू झाल्यामुळे वाक्य टंकलेखन होईना. मी संगणक दोन वेळा बंद करून चालू केला, तरीही ही अडचण सुटली नाही. ही धारिका टंकलेखन करतांना बोटे प्रत्येक वेळी जड होत होती. त्यात शब्दच टंकलेखन होत नव्हते.
याच वेळी अन्य वृत्तसेवेच्या संदर्भात धारिका उघडल्यास ती टंकलेखन होत होती. केवळ याच धारिकेला अडचण येत होती. याच धारिकेच्या समवेत उघडलेली अन्य एक धारिका ‘गारबेज’ म्हणजे खराब झाली. श्री हालसिद्धनाथ, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना अत्यंत तळमळीने प्रार्थना केल्यावर ही समस्या सुटली !’
– श्री. अजय केळकर, सांगली. (६.१२.२०२०)