मागील आश्वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी
नगर – राळेगणसिद्धी येथे ५ फेब्रुवारी २०१९ या दिवशी तत्कालीन कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन अन्य मंत्र्यांसमवेत शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. त्या वेळी उपस्थित करण्यात आलेल्या सूत्रांवर केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले; परंतु दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी दिली आहे. आंदोलनाचा तपशील लवकरच जाहीर करू, असे पत्र हजारे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठवले आहे. त्यामुळे हजारे यांचे आंदोलन झालेच, तर ते देहलीतील शेतकर्यांच्या सूत्रांपेक्षा वेगळ्या सूत्रांवर असणार आहे. यात नव्या कृषी कायद्यांसंबधी हजारे यांनी कोणताही उल्लेख केला नाही किंवा विरोध किंवा पाठिंब्याची भूमिकाही जाहीर केलेली नाही.
अण्णा हजारे यांच्या प्रमुख मागण्या
१. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता द्या.
२. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून कृषी मालाचे उत्पादन शुल्क आणि किंमत ठरवा.
३. फळे, भाज्या आणि दुधाला न्यूनतम आधारभूत किंमत ठरवून द्या.
४. शेतकर्यांना कर्जमुक्त करा.
५. आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरवा.
६. आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोचवा आणि त्यासाठी अनुदान द्या.