अमरावती येथे आधुनिक वैद्यांच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन
४३ आधुनिक वैद्यांचा सहभाग
अमरावती, १७ डिसेंबर (वार्ता.) – आपण सर्वजण २०२० हे संपूर्ण वर्ष कोविडच्या आपदेखाली घालवले. बर्याच जणांना कोरोनाच्या संसर्गामुळे पुष्कळ ताण सोसावा लागला. हा ताण घालवण्यासाठी काहींनी व्यायाम करणे, गाणी ऐकणे, खेळ खेळणे यांत मन रमवले; मात्र त्यातून हवा तसा आनंद मिळू आणि टिकू शकला नाही. हा आनंद मिळवण्यासाठी धर्माचरण आणि साधना करून त्याद्वारे अंतर्मनातील आनंद शोधणे आवश्यक आहे. कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करण्यासह स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी स्वयंसूचना देणे, आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सनातनच्या संकेतस्थळावर अनेक आध्यात्मिक उपाय सांगितले आहे. या उपायांमुळे स्वतःतील सकारात्मकता वाढते. त्यामुळे सगळ्यांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन डॉ. ज्योती काळे (MBBS, MD Anesthesia, fellowship in emergency medicine (भूलशास्त्र तज्ञ)) यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे आधुनिक वैद्यांच्या झालेल्या बैठकीत केले. डॉ. काळे या पुणे येथील नवले रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात भूलशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २२ वर्षांपासून त्या सनातन संस्थेच्या माध्यमातूनही साधनारत आहेत. बैठकीचा लाभ ४३ जणांनी घेतला. बैठकीचे सूत्रसंचालन श्री. विद्याधर जोशी आणि सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले.
आरंभी शंखनाद आणि जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करून प्रत्यक्ष बैठकीला आरंभ झाला. बैठकीचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी सांगितला. ‘मनःशांतीसाठी साधनेची आवश्यकता’ या विषयावर डॉ. काळे बोलत होत्या. या वेळी अनेक आधुनिक वैद्यांनी त्यांना प्रश्न विचारले. यात डॉ. अविनाश चौधरी, डॉ. किरण मायी, डॉ. शिरीष बाप्तीवाले यांचा समावेश होता. डॉ. ज्योती काळे यांनी त्यांचे शंकानिरसन केले. अनुभव कथनामध्ये डॉ. अमृता भागवत, डॉ. सुखदा कुळकर्णी, डॉ. रमेश वरुडकर, डॉ. पंडित थोटे, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. समिधा वरुडकर यांनी साधनेच्या बळामुळे आपण कसे यशस्वी होऊ शकलो, हे सांगितले.
सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी सर्वांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. ‘डॉक्टर म्हणजे रुग्णांचे देवच असतात. कोरोनाचा उदय कसा झाला, हे प्रगत विज्ञानालाही शोधता आलेले नाही; म्हणून आपण प्रत्येकानेच साधना करणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन त्यांनी केले.