‘भामा-आसखेड’च्या पाण्यावरून जलसंपदा आणि महापालिका यांच्यात वाद होण्याची शक्यता
पुणे – शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना आहे. सध्या या भागाला लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भामा-आसखेड योजना पूर्ण झाल्यामुळे धरणातून उचलण्यात येणार्या वार्षिक २.६४ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाण्यावरून जलसंपदा आणि महापालिका यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला दिल्या जाणार्या पाणी कोट्यात २.६४ टीएम्सीने कपात केली जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे; मात्र २०११ ची लोकसंख्या गृहित धरून तेव्हा करार झाला होता. अद्याप सुधारित करार झालेला नाही. त्यामुळे धरणातून पाणी अल्प मिळण्याचा प्रश्नच नाही, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
५ कि.मी. परिघातील गावांना महापालिकेला पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पाणीकोटा वाढवून द्यावा, अशी महापालिकेची मागणी आहे. ‘लष्कर जलकेंद्रातील पाणी अन्य भागाला दिले जाईल’, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.