तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन
मंगळुरू – कार्तिक मासाच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे १४ डिसेंबरला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील आश्रमात तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मा देवीचे दिव्य आगमन झाले. या वेळी समवेत देवीच्या मंदिरातील आध्यात्मिक विचारवंत श्री. पवनकुमार, मंदिराचे विश्वस्त श्री. लक्ष्मीश, मंदिराचे पूजारी श्री. सिद्धेश शास्त्री आदी उपस्थित होते. या वेळी श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी देवीला आरती ओवाळून आणि पुष्पहार अर्पण करून तिचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करत सनातनचे संत पू. विनायक कर्वे, पू. रमानंद गौडा यांनी देवीचे दर्शन घेतले.
या वेळी देवीने सोबत आलेल्या भक्तांच्या माध्यमातून ‘सनातनचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, असा आशीर्वाद दिला, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची प्रशंसा केली. या भक्तांनी सांगितले की, सनातनचे कार्य अद्भुत आहे. आम्हीही तुमच्या कार्याला हातभर लावू. तुम्ही सर्वांनी देवीच्या मंदिराला भेट द्यावी.
श्री देवीला अर्पण केलेला सुपारीचा मोहोर हा प्रसादरूपात साधकांना दिला. सनातनच्या साधिका सौ. मंजुळा गौडा यांनी देवीची ओटी भरली, तर पू. रमानंद गौडा आणि पू. कर्वे मामा यांनी बिल्वार्चन केले. त्यानंतर आरती आणि अन्य विधी करण्यात आले. सायंकाळी देवीचे आश्रमातून भावपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले.