५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मांद्रे, गोवा येथील कु. आर्या विष्णु दाबोलकर (वय ३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आर्या विष्णु दाबोलकर ही एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
कु. आर्या दाबोलकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी कु. आर्या विष्णु दाबोलकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि मामी यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. ‘आर्या जन्मापासूनच हाताच्या बोटांची मुद्रा करते. तेव्हा ‘ती नामजप करत आहे’, असे वाटते.
२. स्वावलंबी असणे
आर्या लहानपणापासून स्वतःच्या हाताने जेवते. ती स्वतःचे कपडे स्वतः घालण्याचा प्रयत्न करते. तिला जमले नाही, तर ती माझे साहाय्य घेते.
३. भाव
३ अ. कृष्णाशी अनुसंधान
१. एकदा ती तिच्या मोठ्या बहिणीच्या (वैष्णवीच्या) समवेत खेळत होती. वैष्णवीने तिला सांगितले, ‘‘आता रात्र झाली. आपण झोपूया.’’ तेव्हा आर्या देवघरात गेली आणि तिने श्रीकृष्णाला सांगितले, ‘आता रात्र झाली. तू झोप.’
२. ती खेळत असतांना आम्हाला येऊन सांगते, ‘‘कृष्ण त्याच्या मित्रांसमवेत खेळत आहे.’’ नंतर काही वेळाने ती आम्हाला सांगते, ‘‘आता तो मडकी फोडायला झाडावर चढून बसला आहे.’’
३. मी घरातील सेवा करतांना आर्याला हाक मारल्यास ती मला सांगते, ‘‘मी राधा आहे. मला ‘राधा’, अशी हाक मार.’’ ती कधी सांगते, ‘‘मी कृष्ण आहे. मला ‘कृष्ण’, अशी हाक मार.’’
३ आ. ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील छायाचित्रे पुष्कळ वेळ पहात रहाते.
३ इ. ‘देवघरातील मूर्ती नीट उचलून ताम्हनात ठेव’, असे सांगणे : एकदा मी देवाची पूजा करत असतांना आर्या माझ्या जवळ उभी होती. मी देवघरातील मूर्ती उचलून ताम्हनात ठेवत होते. तेव्हा तिने मला लगेच सांगितले, ‘‘देवाला असेच उचलून ठेवू नको. देवाची मूर्ती नीट धर आणि ताम्हनात ठेव, म्हणजे त्याला दुखणार नाही.’’ त्या वेळी मला माझी चूक लक्षात आली.’
– सौ. विद्या विष्णु दाबोलकर (आई), मांद्रे, गोवा.
४. अनुभूती
‘आर्याच्या बारशाच्या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाळण्यात तिच्या डोक्याजवळ ठेवला होता. तेव्हा ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून तिचा पाळणा हलवत आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’
– सौ. स्वाती रामा गांवकर (मामी) मये, डिचोली. (३०.८.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |