गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा शासन प्रयत्न करेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कर्नाटक सरकारने गोहत्याबंदी कायदा संमत केल्याचे प्रकरण

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक नुकतेच संमत केले आहे. यामुळे गोव्यात गोमांसाचा गेले काही दिवस तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘नाताळच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात सध्या गोमांसाचा तुटवडा भासत असल्याची शासनाला माहिती आहे. गोव्यात गोमांस उपलब्ध करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.’’ गोव्यात गोमांसाची दुकाने बंद झाल्याने गोमांस विक्रेते, गोमांस भक्षक आणि चर्च संस्था यांनी नाताळपूर्वी गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा शासनावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे.

गोव्यातील ‘कुरेश मांस विक्रेता संघटने’ची मागणी

(म्हणे) ‘कर्नाटकने गोहत्याबंदी कायदा संमत करू नये, यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक शासनाशी चर्चा करावी !’

पणजी – कर्नाटक शासनाने गोहत्या बंदी कायदा संमत केल्यास गोव्यातील गोमांस विक्रेत्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होईल. यासाठी कर्नाटक शासनाने गोहत्याबंदी कायदा संमत करू नये, अशी मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक शासनाकडे करावी, असे आवाहन ‘कुरेश मांस विक्रेता संघटने’ने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक नुकतेच संमत केले आहे; मात्र हे विधेयक विधान परिषदेत संमत करायचे आहे. विधान मंडळाने हे विधेयक संमत केल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार आहे.