सावंतवाडीत प्राणघातक आक्रमण झालेल्या टेम्पोचालकाचे निधन
सावंतवाडी – शहरातील जिमखाना मैदानाजवळ प्राणघातक आक्रमणात गंभीर घायाळ झालेले टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) यांचे बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना १६ डिसेंबरला निधन झाले.
टेम्पोचालक पाटील आयशर टेम्पोतून ग्रॅनाईट आणि टाईल्स घेऊन गगनबावडा येथून १२ डिसेंबरला पहाटे ४.३० वाजता सावंतवाडी येथे आले होते. तेथे आल्यानंतर शहरातील जिमखाना मैदानानजिक लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर दोघांनी चाकूने प्राणघातक आक्रमण केले होते. यामध्ये ते गंभीर घायाळ झाल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पोलिसांनी शहरातील सर्व ‘सीसीटीव्ही फूटेज’ आणि आक्रमणकर्त्यांचे समजलेले वर्णन यांवरून शोध घेऊन चंदन उपाख्य सनी अनंत आडेलकर (रहाणार सावंतवाडी) आणि अक्षय अजय भिके (रहाणार गोवा) या २ संशयितांना अटक केली होती. या दोघांना न्यायालयाने १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.