(म्हणे) ‘जवाहरलाल नेहरूंमुळे गोव्याला स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या अपप्रचाराला बळी पडू नये !’ – दक्षिणायन अभियान
जे सत्य आहे, ते कसे लपून रहाणार ? नेहरूंच्या गांधीवादी भूमिकेमुळेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षे गोमंतकीय स्वातंत्र्यापासून वंचित राहिले.
पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) – पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे गोव्याला स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानाचा ‘दक्षिणायन अभियान’ या संस्थेने निषेध केला आहे. याउलट गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पं. नेहरू यांचा मोलाचा वाटा असल्याचा दावा ‘दक्षिणायन अभियान’ने केला आहे. (गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व म्हणजे काहींच्या मते पोर्तुगीजधार्जिणेपणा, पोर्तुगिजांची संस्कृती आदी ! ही मानसिक गुलामगिरी आहे. गोव्याचे अस्तित्व पोर्तुगिजांच्या क्रूर राजवटीपूर्वीपासून वेगळेच होते. भारतासमवेत गोवाही मुक्त केला असता, तरी गोव्याचे वेगळे अस्तित्व टिकले असते. त्यामुळेच गोमंतकीय हिंदूंनी संस्कृतीच्या दृष्टीने स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मराठी शाळांना पाठिंबा दिला, तरी महाराष्ट्रात विलीन होण्यास विरोध केला होता. – संपादक) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा मुक्तीसाठी पंडित नेहरू यांच्या योगदानावर प्रकाश टाकावा, असे आवाहन ‘दक्षिणायन अभियान’चे दामोदर मावजो यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेला ‘दक्षिणायन अभियान’चे दत्ता नायक आणि संदेश प्रभुदेसाई यांचीही उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत दामोदर मावजो पुढे म्हणाले, ‘‘पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे गोव्याला स्वातंत्र्य उशिरा मिळाले’, अशी विधाने केल्यामुळे लोक संभ्रमित होत आहेत. वास्तविक गोवा मुक्त होण्यासाठी भारत सरकार उत्तरदायी होते. भारत सरकारने त्या वेळी सर्व तर्हेचे उपाय केल्यानंतर ‘ऑपरेशन विजय’ च्या नावाने सैन्यबळाच्या ताकदीवर गोवा पोर्तुगिजांच्या जोखडांपासून मुक्त केला. या वेळी कोणत्याही स्वरूपात रक्तपात झाला नाही आणि यामुळे भारत सरकारने किती संवेदनशीलपणे हा विषय हाताळला असेल, हे लक्षात येते. (सैन्यबळाचा वापर केल्यावर रक्तपात झाला नाही. त्यामुळे तो आधीच करायला हवा होता; कारण तीच भाषा पोर्तुगिजांना समजते. त्याआधी सत्याग्रहाचे गांधीवादी धोरण कित्येक वर्षे अवलंबले आणि त्यात कितीतरी स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगिजांच्या छळाला सामोरे जावे लागले, तर कित्येकांचा मृत्यू झाला. – संपादक) राजकीय स्वार्थापोटी याविषयी चुकीची माहिती दिली जात आहे. लोकांनी चुकीच्या माहितीला बळी पडू नये.’’
दत्ता नायक म्हणाले,‘‘कोकणी भाषेला योग्य स्थान देण्यासाठी पंडित नेहरू यांचे योगदान लाभले आहे आणि आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे.’’ संदेश प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘गोवा महाराष्ट्रात विलीन न होण्यासाठीही पं. नेहरू यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.’’