जिल्हा पंचायती आणि ग्रामपंचायती यांना अधिक निधी अन् अधिकार देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोवा मंत्रीमंडळ बैठक
पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) – नव्याने निवडून आलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायती, तसेच ग्रामपंचायती यांना अधिक निधी आणि अधिकार देण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांना संबोधित करत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना पालिका क्षेत्रातही राबवली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे पंचायतींच्या ग्रामसभा स्थगित करण्यात आल्या होत्या आणि आता या ग्रामसभा पुन्हा चालू करण्यात येणार आहेत. राज्यातील पंचायतींना १८ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.’’
२५ जानेवारी २०२१ पासून एक आठवड्याचे गोवा विधानसभेचे अधिवेशन
गोवा विधानसभेचे २५ जानेवारी २०२१ पासून एक आठवड्याचे अधिवेशन घेतले जाणार आहे; मात्र राज्याचा अर्थसंकल्प मार्च-एप्रिल या काळातील अधिवेशनात मांडला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिक कालावधीसाठी असेल.