श्री अनंत देवस्थानातील शेषासन
सावई-वेरे येथील श्री अनंत देवस्थानातील शेषशायी श्री अनंताची शेषासनातून मिरवणूक, ही कल्पनाच आगळीवेगळी आहे. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय कांसावली येथील कै. पांडुरंग भास्कर शेट वेरेकर (पारूबाब) यांना द्यावे लागेल. आपल्या मनात अनेक कल्पना येतात; पण त्या प्रत्यक्षात साकार होण्यास आपल्यामध्ये तसे सामर्थ्य असावे लागते किंबहुना त्या वाहनात स्थानापन्न होण्याची श्रींची इच्छा ही तर सर्वांत अधिक महत्त्वपूर्ण असते. या सर्व गोष्टींचा ज्या वेळी संगम होतो, तेव्हाच अशा कल्पना मूर्तीमंत स्वरूपात (प्रत्यक्षात) उतरतात, याचा प्रत्यक्षात अनुभव आम्हाला आला.
कै. पांडुरंग भास्कर शेट वेरेकर (पारूबाब) हे माझे सासरे ! स्वतःला अनंतसेवक मानणारे. ते नित्य श्रींच्या चरणी लीन होत. श्री अनंताची काव्याराधना करणारे, देवळात श्रींच्या समोर बसून अभंग गाणारे, परिवार, व्यवहार, समाज, नातीगोती आदी सर्व सांभाळून, धार्मिक गोष्टी सांभाळून सतत भक्तीरसात डुंबणारे सेवाभावी व्यक्तीमत्व ! अशा या अडल्यानडलेल्यांच्या साहाय्याला धावून जाणार्या सज्जनाची सून होण्याचे भाग्य मला लाभले.
सावईवेरे येथील श्री अनंत आमचे कुलदैवत असून सासरे पंधरवड्यातून एकदा येणार्या दशमीच्या पालखीला न चुकता जात असत. महाजन असल्याने देवस्थानच्या कारभारात सहभागी होणारे ते हसतमुख व्यक्तीमत्व होते. त्यांच्या काकी पू. जानकी शेट वेरेकर (पू. आऊबाई) या बेंगळुरूला सिद्धारूढ स्वामींचा मठ चालवत असत. त्याही श्री अनंताच्या निस्सीम भक्त होत्या. त्या विरक्त जीवन जगणार्या होत्या. त्यांच्या मनात आले की, आपण अनंत जत्रोत्सवात श्रींसाठी एखादे आसन करावे. त्यांनी त्यांची ही इच्छा माझ्या सासर्यांकडे बोलून दाखवली आणि सासर्यांनी त्यांना त्वरित होकार दर्शवला. त्यांच्या मनात हाच विचार घर करून राहिला. मध्यंतरी ते बेंगळुरूला देवळात गेले असता त्यांच्या शोधक दृष्टीस तिथे असलेली श्री अनंताची शेषशायी मूर्ती पडली. त्यांच्या मनात लगेच विचार आला की, आपण शेषासन बनवले तर ?
ही कल्पना त्यांनी लगेच त्यांच्या काकीस सांगितली. तिनेही त्याला संमती दिली आणि अत्यानंदाने ते या कामी लागले. तेथील कारागिरांना भेटून आपल्या मनातील आसनाची कल्पना देऊन त्यांच्याकडून मनासारखे आसन करू घेतले. ते स्वतः कलाकार, चित्रकार होते. त्यांनी त्यांच्या मनातील कल्पना कागदावर चित्रस्वरूपात उतरवली होती. शेष हा शुद्ध पितळेचा बनवला. अप्रतिम कलाकुसर, नक्षीकाम, अधूनमधून शुद्ध तांब्याचा वापर करून डोळे दीपवणारा सुंदर असा सात फण्यांचा शेषनाग तयार केला गेला. लाकडी आसन तयार करून त्याखाली लाकडी कासव म्हणजेच ‘कूर्म’ भगवान श्रीविष्णूंचा कूर्मावतार बनवला. संपूर्ण रथ लाकडी होता. खरच त्याची सुंदर कल्पना सत्यात उतरली. आर्थिक साहाय्य काकींनी केले आणि पूर्ण दायित्व सासर्यांनी पेलले.
वर्ष १९७३ मध्ये श्री अनंताच्या जत्रोत्सवात सातव्या रात्री श्रींची मिरवणूक शेषासनातून काढण्यात आली. त्यापूर्वीचे उद्यापनाचे सर्व धार्मिक विधी पू. आऊबाई यांच्या उपस्थितीत माझ्या सासूसासर्यांनी केले. तेव्हापासून आजतागायत आमचे शेट वेरेकर कुटुंबीय (कांसावली) यांच्या वतीने हे कार्य श्री अनंत करवून घेत आहे. आम्ही सर्व कुटुंबीय मनोभावे हे कार्य पुढे चालवत आहोत. खर म्हणजे ही आमची पूर्वपुण्याईच आहे. आज सासूसासरे आमच्यात नाहीत; पण त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत. भविष्यातही श्रींची अशीच कृपादृष्टी आमच्या कुटुंबियांवर राहू दे, हीच श्रीचरणी प्रार्थना !
– सौ. सुमन रामनाथ शेट वेरेकर, निवृत्त मुख्याध्यापिका, कांसावली, गोवा.