तुझ्या प्रीती कृपेने भरलीस देवा ही अंजुली (ओंजळ) ।
कशास वाटते देवा बोलाव्या तुजसवे गुजगोष्टी ।
करशी तूच ना या शब्दफुलांची सतत वृष्टी ॥ १ ॥
एकेक शब्दातून फुलांचा दरवळतो सुगंध ।
या मधुर सुगंध फुलांचा आगळाच छंद ॥ २ ॥
देहची होता परब्रह्म सोडोनी गेला नामरूपी भ्रम ।
आता शरिराच्या ठायी नुरे आडनावांचाही विभ्रम ॥ ३ ॥
इंद्रादिका देवा सर्वस्व वाटे, ऐसे मोठे स्वर्गसुख ।
झाले तेही ना त्याज्य, तुच्छ वाटे तुझे होता दर्शनमुख ॥ ४ ॥
देवा, किती मधुर बोल तुझे, मन होते तल्लीन ।
योगक्षेम तो वाहसी भक्तांचा होता तव पदी लीन ॥ ५ ॥
स्वर्ग-नरक ते नेती तुजपासोनी दूर ।
पुण्यात्मके पापे का स्वर्गी जावे, तू रहासी सुदूर ॥ ६ ॥
तया कर्मा पुण्यकर्म संबोधिता तुटावी ती रसना ।
ऐसा सुबोध करूनी आनंद देसी भक्ताच्या मना ॥ ७ ॥
ऐशा या कर्म पुण्याचिया नावे कशास जोडावे पातक ।
कशास हवे भक्ताने यज्ञयाग वेदशास्त्र पारंगत ॥ ८ ॥
कशास बैसावे कल्पतरू खाली गाठवीत फाटकी झोळी ।
पहावा तो भगवंत याची देही याची डोळी ॥ ९ ॥
सत्कर्माचेही होती सायास वृथा जाती ज्ञानावीण ।
त्या कर्माचा ज्ञान अनुग्रह देऊनी भक्तांस करीशी प्रवीण ॥ १० ॥
देव स्वरूपी देऊनी प्रीतीने भक्ता करीशी तृप्त अंतर्बाह्य ।
भक्त सखा होऊनी भक्ता करीशी साहाय्य ॥ ११ ॥
तुझे वर्णन करीता शेषाच्या सहस्र रसना दुभंगल्या ।
आम्ही भक्त तुझे पामर, लेखणी खाली ठेवू लागल्या ॥ १२ ॥
तुज अर्पण करता ही शब्द गंधाची पुष्पांजली ।
तुझ्या प्रीती कृपेने भरलीस देवा ही अंजुली (ओंजळ) ॥ १३ ॥
– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (९.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |