बहुगुणी आवळा !
१. आवळा – औषधांचा राजा
‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात. आमला एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूला आवळा अर्पण करतात. थंडीच्या दिवसात आवळी भोजन करतात. तुलसी विवाहामध्ये आवळा आवर्जून वापरला जातो. आवळ्यामध्ये विष्णुतत्त्व अधिक प्रमाणात असते. अशा आवळ्याचा आध्यात्मिक स्तरावर अतिशय लाभ होतो.
आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार ‘पित्त, बद्धकोष्ठता, केस गळणे, अकाली केस पिकणे, त्वचारोग, जीवनसत्व ‘सी’ची कमतरता’ यांवर रामबाण उपाय, म्हणजे आवळ्याचे सेवन करणे.
२. आवळ्यापासून बनणारे पदार्थ
अ. आवळा चूर्ण आ. आवळकाठी
इ. आवळा सुपारी ई. मोरावळा
उ. सरबत ऊ. आवळा कँडी
ए. पाकवलेला आवळा ऐ. लोणचे
ओ. आवळ्याचे तेल औ. च्यवनप्राश
३. यांतील काही पदार्थ करण्याच्या पद्धती
३ अ. आवळा चूर्ण : हे दोन प्रकारे सिद्ध करता येते.
१. प्रथम आवळे स्वच्छ धुवून उकळून घ्यावे. ते गार झाल्यावर त्यातील बिया काढून फोडी उन्हात कडकडीत वाळवाव्यात. फोडी पूर्ण सुकण्यास अनुमाने ७ – ८ दिवस लागतात. नंतर त्या सुकलेल्या फोडींचे चूर्ण करावे.
२. कच्चे आवळे बिया काढून चिरून घ्यावेत. त्या फोडी ७ – ८ दिवस उन्हात कडकडीत वाळवाव्यात. नंतर पूर्ण सुकलेल्या फोडींचे चूर्ण करावे.
अशा प्रकारे केलेले आवळा चूर्ण सकाळी अनशापोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी २ चमचे कोमट पाण्यासह घेतले असता ‘उच्च रक्तदाब, पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, केसांचे सर्व विकार, त्वचारोग’ या विकारांमध्ये अतिशय लाभ होतो.
३ आ. आवळा कँडी : ही दोन प्रकारे करता येते.
१. आवळे स्वच्छ धुवून उकडून घ्यावेत. नंतर त्यातील बिया काढून टाकून त्याच्या फोडी कराव्यात. जेवढ्या एकूण फोडी, तेवढ्या आकाराची साखर मिसळून ते मिश्रण काचेच्या बरणीत भरावे. बरणीच्या तोंडाला पातळ सुती कापड बांधून ती बरणी ३ – ४ दिवस उन्हात ठेवावी. नंतर बरणीतील फोडी वेगळ्या काढून उन्हात वाळवाव्यात. बरणीत खाली शेष राहिलेला आवळ्याचा पाक सरबत म्हणून वापरता येतो. या वाळलेल्या फोडी, म्हणजेच आवळा कँडी अनेक दिवस टिकते.
२. आवळे स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर ते ५ ते ७ दिवस ‘डीप फ्रिज’मध्ये ठेवावेत. नंतर ते बाहेर काढून त्यातील बिया काढाव्यात. नंतर त्याच्या फोडी करून जेवढ्या एकूण फोडी, तेवढ्या आकाराची साखर त्यामध्ये मिसळावी. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून बरणीच्या तोंडावर पातळ सुती कापड बांधून ती बरणी ३ – ४ दिवस उन्हात ठेवावी. नंतर बरणीतील फोडी वेगळ्या काढून उन्हात वाळवाव्यात. पूर्ण वाळलेल्या फोडी, म्हणजेच आवळा कँडी बरणीत भरावी. ती अनेक दिवस टिकते. फोडी काढून राहिलेला आवळ्याचा पाक सरबत म्हणून वापरता येतो.
३ इ. आवळा सुपारी
१. आवळे स्वच्छ धुवून उकडून घ्यावेत. ते गार झाल्यावर त्यांतील बिया काढून गर एकत्र कुसकरून घ्यावा. गरामध्ये सैंधव मीठ, ओवा, जिरेपूड आणि आल्याचा कीस मिसळावा. या मिश्रणाचे काबुली चण्याच्या आकाराएवढे सांडगे घालून ते उन्हात वाळवावेत किंवा ‘प्लॅस्टिक’ कागदावर या गराचा पातळ थर पसरून तो उन्हात वाळवावा. नंतर ते सांडगे, म्हणजेच आवळा सुपारी डब्यात भरून ठेवावी.
२. कच्चे आवळे धुवून नंतर किसून घ्यावेत. त्यामध्ये मीठ मिसळून ते मिश्रण उन्हात कडकडीत वाळवावे. वाळलेली सुपारी डब्यात भरून ठेवावी. ती पुष्कळ दिवस टिकते.
३ ई. मोरावळा
१. आवळे स्वच्छ धुवून किसून घ्यावेत. त्यात किसाच्या सव्वापट साखर मिसळावी. ते मिश्रण जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर शिजवावे. त्यात थोडी वेलचीची पूड घालावी. हा मोरावळा काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
२. आवळे स्वच्छ धुवून उकडून घेऊन किसावेत. जेवढा आवळ्याचा कीस, त्याच्या सव्वापट साखर त्यामध्ये मिसळून ते मिश्रण जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर शिजवावे. स्वादासाठी त्यात थोडी वेलचीची पूड घालावी. हा मोरावळा काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
३ उ. आवळकाठी
१. आवळे स्वच्छ धुवून ते उकळून घेऊन त्यातील बिया काढाव्यात. त्याच्या फोडी करून त्या उन्हात कडकडीत वाळवून काचेच्या बरणीत भरून ठेवाव्या.
२. आवळे स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून ते चिरून घ्यावेत. या फोडी उन्हात कडकडीत वाळवाव्यात. ही आवळकाठी काचेच्या बरणीत भरून ठेवावी.
३. आवळ्याच्या रसाचा धातूच्या वस्तूंवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे आवळ्यापासून सिद्ध केलेले पदार्थ नेहमी काचेच्या भांड्यांत साठवावेत.
४. आवळे काढतांना घ्यायची काळजी : ‘आवळ्याच्या झाडावर मधमाशांचे पोळे असते’, यासाठी आवळे काळजीपूर्व काढावेत.
५. झाडावरून आवळे काढल्यावर १ – २ दिवसात आवळ्याचे पदार्थ बनवावेत.’
– श्रीमती शीतल जोशी, सनातन आश्रम, मिरज (२२.११.२०२०)