प्रथम टप्प्यात कोविड लस आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी यांना देणार ! – जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा, १६ डिसेंबर (वार्ता.) – प्रथम टप्प्यात आरोग्य क्षेत्रात काम करणार्यांना कोविड लस देण्याविषयी शासनाने आराखडा मागितला आहे. यामध्ये शासकीय, खासगी आधुनिक वैद्य, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्याविषयीचे नियोजन तात्काळ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड लस वितरणाविषयी बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की, सध्या जिल्ह्यातील ९६ शीतकपाटे उपलब्ध असून त्यांची क्षमता १ सहस्र ९७० लिटर आहे, तर डीप फ्रीजची क्षमता ३ सहस्र लिटरहून अधिक आहे. त्यामुळे संबंधितांनी लस साठवण करण्यासाठी योग्य ते नियोजन करून तसा अहवाल द्यावा. खासगी आधुनिक वैद्यांनी स्वत:कडील आरोग्य कर्मचारी यांना कोविड लस देण्याविषयी जिल्हा परिषदेच्या लिंकवरील स्प्रेडशीटमध्ये माहिती भरावी.