श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन कोरोना माझ्या पायाशी घेईन आणि त्याला नष्ट करीन !
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी, कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) – भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल, गार्हाण घालल. कोरोना माझ्या पायाशी घेईन, त्याचं गाडप (नष्ट) करीन. ३३ कोटी देवांच दरबार बंद पडल्यात. खडकाचा दरबार (जिथे यात्रा होते, जिथे भाकणूक होते ते ठिकाण) उघडा आहे. चालू राहील, ही धर्माची गादी हाय. ‘धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा’, असे आशीर्वचन श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाने भक्तांना दिले. ही भाकणूक ३ नोव्हेंबर २०२० या दिवशी पहाटे ४.१५ वाजता पू. भगवान वाघापुरे (डोणे) महाराज यांच्या माध्यमातून सांगण्यात आली.
या भाकणुकीत ‘भगवा झेंडा राज्य करील, शत्रूराष्ट्र चीन भारतावर आक्रमण करील, भारत-पाक सीमेवर रण चालेल, पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल, स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशावरून पुसून जातील’, असे पुढे सांगण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांमुळे या वेळी आप्पाचीवाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्वर, कोल्हापूर आदी गावांतील भक्तगण अल्प संख्येत उपस्थित होते.
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय !
(ही भाकणूक कशा स्वरूपाची असते, हे सर्वांना कळावे, यासाठी ती येथे आहे तशी प्रसिद्ध करत आहोत. या भाकणुकीचा सर्वसाधारण अर्थ वाचकांना समजावा, यासाठी त्यातील काही वाक्यांचा अर्थ कंसामध्ये दिला आहे. – संपादक)
(संकलक : सेवेकरी श्री. वीरभद्र विभूते आणि श्री. राजेंद्र विभूते, कुर्ली, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव.)
भाग २.
भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431601.html
७. धरणीमाता दुभंगून जाईल ।
नदीकाठची जमीन ओसाड पडेल. १२ वर्षांची मुलगी आई होईल. कानानं ऐकशिला, डोळ्यान बघशीला, नीतीमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय. उगवत्या सूर्याला संकट पडलया. (आताची एकूण परिस्थिती पहाता नीतीमत्तेचा र्हास, मनुष्याचे अधर्माने वागणे, त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी वाढणे आदींमुळे पृथ्वीचा तोल ढासळत आहे.) जाती-धर्म बाळांनो, बिघडत जातील. जाती-धर्मात वैरत्व वाढल, हाणामार्या होतील. पारवं फुल सुफल जाईल, पिवळं फूल उदंड पिकेल मोलानं विकेल, पांढरं फूल मध्यम पिकेल, जांभळ फूल उदंड पिकेल. (वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असून त्या त्या पिकांप्रमाणे त्या त्या फुलांचा रंग असेल. ‘ज्या रंगाची फुले उदंड पिकतील’, असे म्हटले आहे, त्या धान्याचे पीक भरपूर होईल. मध्यम पिकेल म्हणजे ते धान्य मध्यम प्रमाणात येईल.)
८. पाकिस्तान देशाचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल ।
मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही. छातीची ढाल करील. पाकिस्तान राष्ट्राशी लढत राहील. पाकिस्तान देशाचा चौथाई कोना ओसाड पडेल (पाकिस्तानशी युद्ध होईल आणि यात इतकी मनुष्यहानी होईल की, पाकिस्तानचा एक चतुर्थांश भाग ओसाड पडेल. – संकलक) आणि भारताच्या ताब्यात येईल. भारतमातेचा तिथं जयजयकार चालंल.
९. कपडा-लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल ।
लुगडी-घोंगडी, कपडा-लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल. सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल (मेंढीचे महत्त्व वाढेल, तर सुती कपड्यांना अधिक महत्त्व रहाणार नाही.), जग दुनियेत एक मोठं नवल होईल, मेंढीच्या पोटाला एक मुलगा जन्माला येईल. हे म्होरल भविष्य हाय. (‘पुढे मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल’, असे देवाला सांगायचे आहे.’ – संकलक) मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय, मेंढी माऊली मेंढक्याला जगदुनिया दाखवील. (मेंढीमुळेच मेंढपाळाला जग पहायला मिळते.)
मेंढीमाऊली मेंढक्याची सुखाची सावली होईल. मेंढीबाईला कलम करतील. मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात खेळेल. मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील. मेंढीबाई पालखीतून मिरवल. मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल. (पूर्वी श्रीमंत घरातील महिला पुतळ्याच्या माळा घालत. त्याचप्रकारे यापुढील काळात मेंढीचे महत्त्व वाढत जाईल. ती सोन्यासारखी मौल्यवान होईल.)
धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारंल. (सध्याच्या काळात माणसे रंग पालटत आहेत. बाह्यतः एक, तर अंतरंगात दुसरेच अशी माणसाची अवस्था आहे. त्यामुळे आता आपण ज्याला मेंढी समजतो, तो प्रत्यक्षात अस्वलासारखा, तसेच हिंसक, क्रूर किंवा कपटीही असू शकेल ! म्हणजेच मनुष्याने ज्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, त्याच्यावर विश्वास न ठेवता अयोग्य आणि चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत आहे.)
१०. साखर आणि गुळ यांचा भाव तेजीत राहील ।
साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. साखरेचं पोतं मोलान विकेल. गुळाचा भाव तेजीत राहील. मांडवाच्या दारी ३५०० म्हणता ३४०० वर येईल ३४०० म्हणता ३३०० वर येईल. (यापुढील काळात साखरेचा भाव एका क्विंटलला किती असेल, ते सर्वसाधारपणे देवाने सांगितले आहे.)
११. तंबाखूमुळे घरंदारं बरबाद होतील ।
चढलं उतरलं तंबाखूची पेंढी मध्यम पिकेल. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. तंबाखूपासून मनुष्याला रोगराई वाढत राहील. घरदार बरबाद होतील. तंबाखूचा बंबाखू होईल. (तंबाखूच्या शेतात तंबाखूसारखेच बंबाखू नावाचे पिक उगवेल. यापुढील काळात हे बंबाखू इतके उगवेल की, त्यामुळे त्या तंबाखूची पूर्णत: हानी होईल. तंबाखूच्या शेजारी उगवणारा बंबाखू हा तंबाखूला लागणारी सर्व पोषक द्रव्ये शोषून घेतो.) मांडवाच्या दारी ३३०० म्हणता ३२०० वर येईल. चढल उतरल ३२०० म्हणता ३००० वर (तंबाखूचा भाव किती असेल, ते सर्वसाधारणपणे देवाने सांगितले आहे.) रसयान भांडं उदंड पिकेल. रसाला धारण माणसाला मरण. (ऊस भरपूर पिकेल. अधिक प्रमाणात ऊस पिकल्याने मनुष्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गरजेपेक्षा अधिक पैसा मिळाल्याने मनुष्य व्यसनाधीन होईल आणि त्यात मृत्यूमुखीही पडेल.)
१२. अठरा तर्हेचा मनुष्याला एक आजार होईल ।
जाळयान ताप किरम खोकला (सध्या होत असलेले कृमी अथवा जंतांपासून होणारे रोग) उदंड हायं अठरा तर्हेचा मनुष्याला एक आजार होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. (‘हे कदाचित् एड्स रोगाच्या संदर्भात असू शकते. सध्या एड्स रोगाला औषध नसून तो अगदी खेड्यापर्यंत पोचला आहे. डॉक्टर लोकही त्यासाठी काही करू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे.’ – संकलक) जरीयान मरीआईची दुनियेवर स्वारी होईल.
आडं चुकेल; पण खेडं चुकणार नाही. (हे कोरोनाच्या संदर्भातील भाकित सध्या सत्यता उतरलेले दिसत आहे. – संकलक) आपली जागा साडेतीन हात आहे. पाची बोटानं मनुष्याने धर्म करावा. उंदराला भिशीला; पण वाघाला भिणार नाही. (ज्या गोष्टी करायला घाबरणे आवश्यक आहे म्हणजे पापकर्म करतांना घाबरणे आवश्यक असतांना मनुष्य घाबरत नाही, तर पुण्यकर्म करतांना घाबरणे आवश्यक नसतांना ते करतांना घाबरत आहे; म्हणजे चांगली कृती करणे टाळत आहे.) चैत्राच्या मासात गायी माळाला जातील. एक रुपया गाडीच्या चकराऐवढी होईल. च्या गा च्या म्या गा म्या करशीला. (प्रारंभीच्या काळात चहा नव्हता, नंतर तो प्रतिष्ठित लोकांकडे होता आणि तो सर्वसामान्यांकडेही आहे. यावरून चहा आता सर्वमान्य झाला आहे आणि सर्वसामान्यांना चहाची चटक लागली आहे ! – संकलक) कापाकापी येईल.
१३. स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल ।
नऊ वर्षांची मुलगी भ्रतार मागल (मनुष्याचे आयुष्य अल्प आणि बुद्धी अधिक अशी स्थिती असून मनुष्याचे आयुर्मान अल्प होत आहे. म्हणजे एकूणच जीवनक्रमच अल्प होत आहे. त्यामुळे यापुढील काळात नऊ वर्षांच्या मुलीचा विवाह होईल म्हणजेच तिची मासिक पाळीही लवकर चालू होईल !), दागिनं पैसे मनुष्याला घातक ठरतील. घरातून गेलेला मनुष्य परत येईल; म्हणून आशा धरू नका. तांबे लोखंड मोलाने विकल. सोनं नाणं काही वर्षांनी फुकाचं होईल. चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात मोठा सट्टाबाजार चालल. राजकीय नेते पैसासंपत्ती गोळा करतील. देशाचा बाजार मांडतील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील, कोलांटउड्या मारतील. स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल. सक्रीय राहील. भगवा झेंडा मोठ्या डौलात मिरवल. इतर पक्ष चिंतेत रहातील.
१४. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल ।
काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहील. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागेल. राजकारणात राजकीय नेते देवाला विसरून जातील. नोकरवर्ग समाज खाईल. पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही. पंचलोक दोन्हीकडून लाच खाऊन भांडण लावतील. पैशांच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खर्याच खोट, खोट्याच खरं. महागाईचा भस्मासूर सुटल. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल. १२ ही महिने लग्न कार्य चालतील.
१५. चीन राष्ट्र भारतावर आक्रमण करेल ।
चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल. गुंडांच राज्य चाललंय. अतिरेकी येतील, मोठा घोटाळा करून जातील, बाँबस्फोट होतील. दिल्ली शहराच मोठं नुकसान होईल. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. शहराला लागून असलेली शहरे खेड्याप्रमाणेच होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. दुनिया कालवून जाईल. (जगात हलकल्लोळ माजेल. सध्या कोरोनामुळे हलकल्लोळ माजलेलाच आहे ! – संकलक) भारत-पाक बाँड्रीवर (सीमेवर) रण घुमलं. आया-बहिणींची दिवसा अब्रू लुटतील.
१६. मुस्लिम राष्ट्रे जगाच्या नकाशातून पुसून जातील ।
मुस्लिम राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशातून पुसून जातील. पाच सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल. (इतक्या अल्प उंचीची माणसे जन्माला येतील की, पाच सेंटीमीटर कापडही त्यांना पुरेसे होईल.) वादळ, भूकंपाने समुद्राची-देशाची उलथापालथ होईल. कृष्णेच्या काठी नऊ लाख बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वहातील. उगावत पेटेल मावळत विझल. (युद्धाची ठिणगी सर्वसाधारणपणे पूर्व दिशेला पडेल आणि ते पश्चिम दिशेपर्यंत येऊन विझेल म्हणजेच सारे जग यात ओढले जाईल. – संकलक) आलम दुनियेचा चौथाई कोना ओसाड पडल. (यापुढील काळ इतका भयानक असेल की, जगाच्या एक चतुर्थांश भागातील लोकसंख्या नष्ट होईल. – संकलक) हिल्लाळ पेटतील, काळरात्र येईल. (पुढचा काळ इतका भयानक असेल की, प्रत्येक दिवस काळरात्र असल्यासारखे वाटेल. वीज गेल्यामुळे हिल्लाळ हा मशालीचा प्रकार पेटवावा लागेल.)
(क्रमशः उद्याच्या अंकात)
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432270.html