आता ‘इगो’ सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
मुंबई – कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांना म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या आरेतील जागेला मान्यता दिली आहे. यामुळे आता तरी ‘इगो’ सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. हिवाळी अधिवेशनातही मी हीच भूमिका मांडली होती; मात्र मुख्यमंत्री ‘मिठाचा खडा का टाकता ?’, असे म्हणाले होते; पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार-जीत करायला नको. मुंबईच्या विकासासाठी कामे करायला हवीत. मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा हा जनता आणि सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित चालू केले नाही, तर प्रकल्प वर्ष २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अट्टाहास का आहे ?’’