गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला !
नवी देहली – देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देहलीमध्ये आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना झाला असून कोलकात्यामध्ये तो ६७० रुपये ५० पैसे, तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोचला आहे. चेन्नईमध्ये यासाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत.
५ किलोच्या गॅसच्या किमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६ रुपये ५० पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. तेल आस्थापने प्रत्येक मासाला गॅस सिलिंडरच्या किमतीची तपासणी करून आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दर यांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात.