एक मासाच्या आत आरोग्य विभाग परीक्षा घेऊन जागा भरेल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे येथील भरती प्रक्रिया कशी होणार, याचा प्रश्न सर्वांनाच पडला आहे; मात्र एक मासाच्या आत परीक्षा घेऊन आरोग्य विभागाच्या ५० टक्के जागा भरल्या जातील. ही भरती आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवकांनी या संदर्भात काळजी करू नये. ‘रोस्टर’ कार्यवाहीसाठी थोडा वेळ लागेल; मात्र तेही लवकरच पूर्ण केले जाईल.
कोरोनाच्या संदर्भातील ‘लस’ देण्याचे नियोजन अत्यंत सूक्ष्म स्तरावर करण्यात आले आहे. अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ही लस पोचवली जाणार आहे. याच्यासाठी साठवणूक ते केंद्रापर्यंत लस पोचवण्याचे आणि ती देणे याचे सर्व नियोजन झाले आहे. केंद्र सरकारने दुर्दैवाने महाराष्ट्राला १ सप्टेंबरनंतर कोरोनाच्या संदर्भातील सर्व साहाय्य देणे थांबवले आहे. असे असतांना राज्याच्या तिजोरीतून आम्ही ती पूर्तता करत आहोत. यापुढील काळात ५०० नवीन रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सभागृहात पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या वेळी उत्तर देतांना दिली.