महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करणार !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – गड-किल्ले ही महाराष्ट्राची ओळख आहे. हा साधूसंतांचा देश आहे. प्राचीन मंदिरे हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे प्राचीन मंदिरांना सोयी-सुविधा मिळायला हव्यात. मंदिरांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. या सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. राज्यातील प्राचीन मंदिरांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करणार आहोत, अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजनेची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.
सभागृहात पुरवणी मागण्यांनंतर केलेल्या भाषणात ते बोलत होते. ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, हे यातून लक्षात येईल’, असे या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारच्या निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन ! – हिंदु जनजागृती समिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी राखीव निधी ठेवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते आणि शासनाचे अभिनंदन करते. हिंदु जनजागृती समितीसहित अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, मंदिर विश्वस्त आणि हिंदु समाज यांच्याकडून कोरोना महामारीच्या काळात एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मंदिर संवर्धनाची मागणी केली होती. त्यालाच यश मिळाले, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली आहे.