आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून कंगना राणावत आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग सादर
पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याविषयी खोटे वृत्त प्रसारित केल्याचे प्रकरण
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या धाडीमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे वृत्त प्रसिद्ध झाले. या प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या विरोधात १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला. या प्रकरणी ‘कायदेशीर सूत्रे पडताळून पुढील निर्णय घेऊ’, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या वेळी सांगितले.
सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करतांना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘पैशाचा काळाबाजार हे लोकशाहीसाठी घातक आहे. अंमलबाजावणी संचालनालयाकडून याप्रकरणी माझे घर आणि कार्यालय यांवर धाड टाकण्यात आली. माझी आणि माझे कुटुंबीय यांची चौकशी चालू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अंमलबजावणी संचालनालयाला मी सहकार्य करत आहे आणि यापुढेही करत राहीन. चौकशीच्या कालावधीत माझ्याकडे पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळाल्याचे खोटे वृत्त अभिनेत्री कंगना राणावत यांनी सामाजिक माध्यमांवर पाठवले, तसेच काही प्रसिद्धीमाध्यमांनीही हे वृत्त प्रसारित केले. हे निराधार आणि खोटे वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी सभागृहाचा हक्कभंग सादर करत आहे. ज्या वृत्तवाहिन्यांनी याविषयीचे वृत्त प्रसारित केले, त्यांची नावे मी अध्यक्षांकडे सुपूर्द करीन.’’