भक्तीत वासना नसते ! – वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी
पुरोगामी म्हणवणारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर सतत गलिच्छ भाषेत लिहितात. यांचे म्हणणे आहे, ‘देवीचे पुजारी मातेला स्नान घालतात, वस्त्रे नेसवतात. यात पुजारी आणि भक्त यांच्या मनात वासना असते.’ अनेक नास्तिक मंडळीही ‘पुजार्यांवर विनयभंगाचे गुन्हे नोंद करा’ असली मागणी करतात, तर काही जण ‘देवीची पूजा बायकांनाच करू द्या’ अशाही मागण्या त्यात रेटवतात. अशा भंपक आक्षेपांचे खंडण येथे देत आहोत.
१. आमच्याकडे (हिंदु धर्मामध्ये) ‘प्रत्येक गोष्टीत केवळ नर-मादी पहा’ एवढेच भंपक तत्त्वज्ञान शिकवले जात नाही.
२. अनेक स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ पुरुष आहेत. जगभरातील लाखो माता-भगिनी बाळंतपणाकरता आणि अन्य अनुषंगाने चिकित्सेसाठी डॉक्टरांकडे जातात. अनेक पुरुष रुग्ण ‘प्रोस्टेट’ ग्रंथी, हर्निया, मूळव्याध अशा विविध आजारांच्या तपासण्या त्या विषयात तज्ञ असलेल्या महिला डॉक्टरांकडून करून घेतात. येथे भावना शुद्ध आहे. डॉक्टरांना आम्ही ‘वैद्यो नारायणो हरि:’ म्हणजे वैद्यांना प्रत्यक्ष नारायणाचे रूप मानतो.
३. कपडे काढणे किंवा पालटणे, हे केवळ लैंगिक भावनेनेच होते, असे नाही. वात्सल्य परिचर्याही भावना असते.
४. कोणतेही वडील आपल्या लहान लेकीला अंघोळ घालतात. तिने प्रातःविधी केल्यावर तिचे कपडे पालटतात, तिथे वात्सल्य असते. अनेक घरात मुले अंथरूणावर खिळलेल्या आईला अंघोळ घालतात, तिला कपडे घालतात. तिथेही वात्सल्य आहे.
५. देवीला साडी नेसवणे, ही आमची मातृभक्ती असून त्यात वासना नाही. आमच्या देवीच्या मूर्तींना वस्त्र प्रावरणे मूर्तीकारांनी कोरलेलीच आहेत. त्या कोरीव वस्त्रांवरच पुजारी वस्त्रे नेसवतात.
६. ‘स्त्री देवतांची पूजा केवळ महिलांनीच करावी’, असा धर्माचा नियम नाही. शिव आणि गणपति यांची पूजा महिला करतात. तिथे कुणी पुरुषांनी किंवा शास्त्राने त्यांना रोखलेले नाही.
७. महिलांनी महिलांची पूजा करावी, असाच दुराग्रह असेल, तर मग शंकर हे पंचवदन (५ मुख असलेले), ब्रह्मदेव हे चतुर्वदन (४ मुख असलेले) आहेत. त्यांच्या पूजेलाही अनुक्रमे ५ आणि ४ तोंडांचे पुजारी हवेत, या मागणीसारखेच हास्यास्पद होईल. उद्या कूर्म (कासव) देवतेची पूजा करायला कासव, देवीच्या वाहनाची पूजा (वाघाची पूजा) करायला वाघ, नंदीची पूजा करायला बैल हवा, अशीही मागणी होईल.
८. माता-भगिनींनी देवतांची पूजा करू नये, असे निर्बंध शास्त्रात नाहीत. हरतालिका, वटसावित्री, शिवामूठ, गोपद्म, प्रदोष, सोमवारव्रत अशा अनेक व्रतपूजा माता-भगिनींसाठी आहेत.
९. त्यामुळे असे विकृत लिखाण करणार्यांना विचारा, ‘तुम्हाला जे फंड (निधी) देतात, त्यांच्यात ‘फादर आणि मदर’ अशी दोन पुजारी पदे असतात का ? कि मौला-मौली अशी स्त्री-पुरुष दोन पुजारी पदे असतात ?’
या विकृतांना जोपर्यंत आपण सणसणीत उत्तरे देणार नाही, तोपर्यंत ते असेच विकृत लिहित रहाणार. ‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखांड) खंडण॥’ (अर्थ – सर्व पाखंड मतांचे खंडण करून वेदप्रतिपादित धर्म रक्षण करावा.) हेच ब्रीद ठेवले पाहिजे.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग