स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाने सूक्ष्मातून केलेले साहाय्य

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत व्यष्टी साधनेच्या आढाव्याचा आरंभी ताण येणे आणि घरी गेल्यावर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या वाक्याने प्रेरित होऊन पुन्हा प्रक्रियेत येणे

‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत आल्यावर पहिला एक मास मला व्यष्टी साधनेच्या आढाव्याचा पुष्कळ ताण यायचा. ‘मनाचा आढावा घ्यायला मला जमणार नाही’, असा विचार वाढला होता. त्या वेळी मी ‘दिवाळीला घरी जायचे आणि परत यायचेच नाही’, असा विचार करून दिवाळीत भात कापणीसाठी घरी गेले. त्या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची भेट झाली. त्यांनी माझी विचारपूस केली आणि म्हणाल्या, ‘‘एक पाऊल पुढे टाकलेस. आता मागे फिरायचे नाही.’’ त्यांचे हे वाक्य माझ्या मनाला प्रेरित करत राहिले आणि शेतीची कामे झाल्यावर मी पुन्हा रामनाथी आश्रमात प्रक्रियेला आले. आता मला कशाचाच ताण येत नाही.

कु. गुलाबी धुरी

२. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या वेळेत आजारी साधिकेची सेवा आल्याने मनाचा संघर्ष होणे आणि आढावासेविकेने ईश्‍वरेच्छेने वागण्यास सांगितल्यावर तसे प्रयत्न केल्यावर आनंद मिळणे

आश्रमात मला स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला जायची इच्छा होती; परंतु त्याच वेळेत मला एका आजारी साधिकेची सेवा मिळाली. प्रशिक्षणवर्ग सकाळी त्याच वेळेत असल्याने माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला. एकदा मी आढावासेविकेला याविषयी सांगितले. तेव्हा तिने सांगितले, ‘‘यापूर्वी तू स्वतः प्रशिक्षण केले आहेस आणि वर्गही घेतले आहेस; परंतु देव आता तुला मनाचे प्रशिक्षण शिकवत आहे. तुला शारीरिक प्रशिक्षणाच्या समवेत मनाचे प्रशिक्षणही आले पाहिजे. तू स्वेच्छा सोड आणि ईश्‍वरेच्छेने वाग, म्हणजे तुला आनंद मिळेल.’’ तेव्हापासून ताईने सांगितल्याप्रमाणे ‘त्या आजारी साधिका नसून संतच आहेत’, असा भाव ठेवून मी सेवा करू लागले. त्यामुळे माझी सेवा छान होऊ लागली आणि मिळालेल्या वेळेत मी प्रशिक्षणालाही जाऊ लागले. ईश्‍वरेच्छेने वागल्यामुळे मला पुष्कळ आनंद घेता येऊ लागला.

३. मनात पूर्वग्रह ठेवून सेवा करतांना सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेले वाक्य आठवणे आणि त्यामुळे खंत वाटून देवाकडे क्षमायाचना करणे

मी स्वयंपाकघरात भांडी घासायची सेवा करत होते. त्या वेळी माझ्या मनात एका साधिकेविषयी पूर्वग्रह होता आणि मनात त्याविषयीचे विचार चालू होते. तेव्हा मला कुंभमेळ्यात सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेले वाक्य आठवले, ‘भिकार्‍याच्या भांड्यात खरकटे असेल, तर त्याला कुणी भिक्षा घालत नाही.’ त्या वेळी मला कळून चुकले, ‘माझ्या मनात पूर्वग्रह असेल आणि मी तशीच सेवा करत असेन, तर मला त्या सेवेतून चैतन्य मिळणार नाही. माझ्या मनात स्वभावदोष आणि अहं यांचे खरकटे असेल, तर देव मला कसा आशीर्वाद देईल ?’ त्या वेळी मला खंत वाटली आणि मी देवाकडे क्षमायाचना केली.

४. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे समष्टीसाठी प्रार्थना करणे आणि त्याविषयी चिंतन केल्यावर इतरांचा विचार करण्याचा भाग वाढल्याचे लक्षात येणे

एकदा मी भाववृद्धी सत्संगात बसले होते. त्या वेळी मी प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, मला भाववृद्धी सत्संगातून चैतन्य मिळू दे. सत्संग एकाग्रतेने ऐकता येऊन मला आकलन होऊ दे.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून आले आणि म्हणाले, ‘सर्वांसाठी प्रार्थना कर.’ त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगितले आहे, तर आपण तशी प्रार्थना करूया’, असा विचार करून मी सर्वांसाठी पुढील प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, भाववृद्धी सत्संगाचा सर्व साधकांना चैतन्याच्या स्तरावर लाभ होऊ दे. सर्वांचे त्रास नष्ट होऊन सत्संगाचे एकाग्रतेने  आकलन होऊ दे.’ त्या वेळी मला आतून पुष्कळ आनंद वाटला आणि चिंतन केल्यावर लक्षात आले, ‘व्यष्टी स्तरावर प्रार्थना करतांना माझी वृत्ती स्वार्थी होती आणि त्यात अपेक्षा होती. समष्टी स्तरावर प्रार्थना करतांना व्यापकत्वाचा विचार वाढला आणि मला आनंद मिळाला. त्यामुळे इतरांचा विचार करण्याचा भाग वाढला.’

५. प्रसाधनगृहाची स्वच्छता करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर तेथे येऊन त्यांनी ‘मी तुझी प्रत्येक कृती पहात आहे’, असे सांगणे आणि त्या वेळी स्वतःतील दिखाऊपणाची जाणीव होणे

मी स्वयंपाकघरात सेवा करतांना माझ्याकडून भाव ठेवून प्रयत्न व्हायचे. पू. (कु.) रेखाताईंचे (पू. (कु.) रेखा काणकोणकर यांचे) सर्व ठिकाणी लक्ष असल्यामुळे ‘सेवा परिपूर्णच करायला हवी’, हे लक्षात येऊन मी तसे प्रयत्न करायचे. एकदा प्रसाधनगृहाची स्वच्छता करतांना तेथे सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव आले आणि म्हणाले, ‘तू स्वयंपाकघरात छान सेवा करतेस; मग येथे कुणी बघत नाही; म्हणून कशीही सेवा करतेस का ? तू विसरू नकोस. मी तुझी प्रत्येक कृती पहात आहे. तू आता जे करत आहेस, ते अयोग्य आहे.’ त्या वेळी मला स्वतःच्या दिखाऊपणाची जाणीव झाली आणि त्या दिवसापासून ‘प्रसाधनगृह म्हणजे चैतन्याची खोली आहे’, असा भाव ठेवून मी सेवा करते.

६. देवाने सूक्ष्मातून अहंची जाणीव करून देणे आणि ‘त्याने मायेतून सोडवून अध्यात्मात आणले’, याविषयी कृतज्ञता वाटणे

पूर्वी माझ्या मनात ‘मी आई-बाबांना सोडून सेवा करण्यासाठी आश्रमात आले आहे. सगळ्या सुख-सोयी सोडून आले आहे’, असा अहंयुक्त विचार होता. या संदर्भात एकदा सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी मला लक्षात आणून दिले, ‘हा तुझा भ्रम आहे. तू म्हणतेस, ‘घराचा त्याग केलास’; पण तू जन्माला येतांना तुझे घर आणले होतेस का ? तुला याचा अहं वाटत असेल, तर तुला जे देवाने दिले आहे, ते तू स्वतःच्या हिंमतीने करून दाखव. जमेल का तुला ?’ तेव्हा माझे डोळे उघडले, ‘मी जन्माला येतांना काहीही आणलेले नाही; मग कशाचा अहं बाळगू ? हे सर्व देवाचे आहे. त्याचे त्याला अर्पण केले; मग त्यागाचा अहं कुठून आला ?’ त्यानंतर ‘देवाने मला मायेतून सोडवून अध्यात्मात आणले’, याविषयी मला कृतज्ञता वाटली.

७. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राच्या समोर उभी राहून स्वतःच्या चुका सांगणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या सूक्ष्मातील मार्गदर्शनामुळे समष्टीत सहजतेने चुका सांगता येणे

माझ्या मनात चुका सांगतांना प्रतिमेचे पुष्कळ विचार यायचे. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर उभी राहून त्यांना चुका सांगायचे. एकदा मी चूक सांगतांना ते मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘तू समष्टीत चुका सांगायला शिकले पाहिजेस. तुला तुझा अहं लवकर नष्ट करायचा आहे ना ? तू मला चुका सांगतेस, तशाच समष्टीत सांग. मी तुझ्या समवेत आहे.’ माझ्याकडून एक गंभीर चूक झाली होती. मी घाबरत ती चूक पू. रेखाताईंना सांगायला गेले. चूक सांगितल्यावर पू. रेखाताईंनी योग्य दृष्टीकोन दिला. त्या वेळी ती चूक मी समष्टीतही सहजतेने सांगू शकले. त्या दिवसापासून मला वाटते, ‘माझ्याकडून झालेली प्रत्येक चूक मोठ्याने सर्वांना सांगून अहं लवकर नष्ट करून गुरूंना अपेक्षित बनायचे आहे.’

८. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया म्हणजे आनंदाची प्रक्रिया वाटणे

‘परात्पर गुरुदेवा, तुम्ही सांगितले होते, ‘प्रक्रिया पूर्ण झाली की, आनंदच आनंद आहे.’ अजून माझी प्रक्रिया पूर्ण झाली नाही; परंतु मला आतापासूनच एवढा आनंद मिळतो की, मी तो शब्दांत व्यक्त करू शकत नाही. गुरुमाऊली, मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया म्हणजे आनंदाची प्रक्रिया वाटते.

एखाद्या अज्ञानी मुलाला त्याची आई प्रत्येक कृतीचे महत्त्व सांगून तसे संस्कार करते, त्याप्रमाणेच गुरुमाऊली या अज्ञानी लेकराच्या बोटाला धरून प्रत्येक क्षणी समवेत राहून प्रसंगावर मात करायला शिकवत आहे. प्रत्येक परिस्थितीत स्थिर रहाण्यासाठी कधी साधकांच्या, तर कधी संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून तूच मार्गदर्शन करत आहेस, त्याविषयी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. गुलाबी दीपक धुरी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (२७.१२.२०१९)

• सूक्ष्म :व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक