अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास विरोधकांचा विरोध
विधान परिषद वृत्त
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – ‘रिपब्लिक टी.व्ही.’चे संपादक अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात हक्कभंगाच्या प्रस्तावावरील अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला; मात्र हे प्रकरण हक्कभंगाच्या नियमांत बसत नसल्याचे सांगत विरोधी पक्षाने यावर आक्षेप घेतला. प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विरोध केला; मात्र सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रस्तावाला मुदतवाढ दिली.
शिवसेनेच्या आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात, तर अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात आमदार भाई जगताप यांनी ८ सप्टेंबर २०२० या दिवशी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता.
प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास आक्षेप घेतांना प्रवीण दरेकर म्हणाले की, अशा प्रकारे हक्कभंग होऊ शकत नाही. कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विशेषाधिकार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मुदतवाढ न देता आपल्या स्तरावर हा विषय निकाली काढावा.
भाई जगताप म्हणाले की, प्रवीण दरेकर यांनी अर्धसत्य माहिती दिली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने हक्कभंग प्रस्ताव सादर करता येणार नाही’, असे सांगितलेले नाही. कंगना राणावत हिने मुंबई शहराला ‘पाकिस्तान’ संबोधले आहे, हे दरेकर यांना ठाऊक नाही का ? विरोधक कंगनाच्या पाठीशी का उभे रहात आहेत ? त्यांना मुंबईविषयी बोलण्याचा अधिकार नाही.