गुरु-शनि ग्रह युती
१. गुरु आणि शनि ग्रह आकाशात सर्वांत जवळ दिसण्याचा कालावधी
‘१६.१२.२०२० पासून गुरु आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या एकदम जवळ येणार असून २१.१२.२०२० या दिवशी ते एकमेकांच्या सर्वांत जवळ असतील.
२. गुरु आणि शनि या ग्रहांची युती आकाशात कोणत्या वेळेत कोणत्या नक्षत्रात होणार आहे ?
सोमवार, २१.१२.२०२० या दिवशी सूर्यास्तानंतर ७.३० ते ९.३० या वेळेत पश्चिम दिशेला गुरु आणि शनि हे दोन ग्रह मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात चतुर्थ चरणात युतीयोगात येतील. ग्रहांची युती होणे, म्हणजे ग्रह एकाच राशीत एकाच अंशावर येणे. या घटनेला खगोलीय इंग्रजी भाषेत ‘ग्रेट कन्जेक्शन’ असे म्हणतात.
३. आकाशात दिसणारी गुरु आणि शनि या ग्रहांची युती कशी पहाता येईल ?
आकाशात दिसणारी गुरु-शनि ग्रहांच्या युतीचे दृश्य साध्या डोळ्यांनी सहज दिसणार आहे. अधिक स्पष्ट पहाण्यासाठी दुर्बिण किंवा टेलिस्कोप वापरावा.
४. गुरु-शनि ग्रह युतीची ज्योतिषशास्त्रीय माहिती
आपल्या सूर्यमालेतील सर्वांत मोठा आणि तेजस्वी ग्रह गुरु हा पाचवा अन् शनि ग्रह हा सहावा आहे. या दोन ग्रहांना सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा वेळ वेगवेगळा आहे. त्यामुळे सुमारे १९ वर्षे ७ मासांनी गुरु-शनि ग्रह युतीयोगात येतात; परंतु प्रत्येक युतीच्या वेळी या ग्रहांमधील अंशात्मक अंतर वेगवेगळे असते. यापूर्वी मे २००० मध्ये मेष राशीत गुरु-शनि ग्रह युतीयोगात होते.
२१.१२.२०२० या दिवशी या दोन्ही ग्रहांतील अंतर ०.१ अंश (६ कला आणि ६ विकला) एवढे असेल. ‘नासा’च्या संशोधनानुसार गुरु आणि शनि हे ग्रह अगदी जवळ येण्याची घटना काही शतकांनंतर घडते. यापूर्वी गुरु आणि शनि हे ग्रह अगदी जवळ येण्याची घटना ३९७ वर्षांपूर्वी, म्हणजे जुलै १६२३ मध्ये झाली होती. त्या वेळी गुरु आणि शनि हे दोन ग्रह कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रात प्रथम चरणात युतीयोगात होते.
गुरु आणि शनि हे ग्रह अगदी जवळ येण्याची घटना २१.१२.२०२० या दिवसानंतर वर्ष २०८० मध्ये दिसू शकेल.
५. गुरु आणि शनि या ग्रहांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
२१.१२.२०२० या दिवशी गुरु हा आकाशतत्त्वाचा ग्रह आणि शनि हा वायुतत्त्वाचा ग्रह मकर या वायुतत्त्वाच्या राशीत युतीयोगात येणार आहे. गुरु हा आध्यात्मिक ग्रह ज्ञानाचा कारक आहे. शनि हा ग्रह चिंतन आणि कर्म यांचा कारक आहे अन् तो न्याय देणारा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी अंतःकरण शुद्ध असावे लागते. अंतःकरण (चित्त) विशाल असते; म्हणून अंतःकरणाचे कारकत्व आकाशतत्त्वाच्या गुरु ग्रहाकडे आहे.
२१.१२.२०२० या दिवशी गुरु आणि शनि या ग्रहांची युती मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात चतुर्थ चरणात होणार आहे. या युतीयोगाचा सूक्ष्म (सखोल) अभ्यास केल्यास लक्षात येते, ‘या दिवशी युतीत असणारे ग्रह (गुरु आणि शनि), त्यांचा राशी स्वामी (शनि), नक्षत्र स्वामी (रवि) आणि नक्षत्राचा चरण स्वामी (गुरु) हे ग्रह आहेत. गुरु, शनि आणि रवि हे ग्रह अनुक्रमे आकाश, वायु अन् तेज तत्त्वांचे आहेत.
गुरु आणि शनि हे ग्रह साधनेतील प्रगतीसाठी पूरक आहेत. गुरु अणि शनि या ग्रहांच्या युतीचे दर्शन घेतांना प्रार्थना केल्यास आध्यात्मिक लाभ होईल.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, रामनाथी, फोंडा, गोवा. (५.१२.२०२०)०