‘विशेष कपडे’ परिधान केल्याने आमदार विनायक मेटे यांना कामकाजात सहभागी होण्यास सभापतींकडून प्रतिबंध
|
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – मराठा आरक्षणाविषयी चर्चा करायची असल्यास आमदार विनायक मेटे यांनी घातलेले विशेष कपडे काढावेत, अन्यथा कामकाजात सहभागी करून घेणार नाही, अशी अट सभापती रामराजे निंबाळकर यांनी घातली होती; मात्र तरीही मेटे यांनी विशेष कपडे काढले नाहीत. ‘वारंवार सांगूनही मेटे विशेष कपडे काढत नाहीत, हे दुर्दैवी आहे’, असे सांगून सभापतींनी मेटे यांना कामकाजामध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध केला. मराठा आरक्षणावरील चर्चेची सूचना सभापतींनी नाकारली आहे. या कारणास्तव विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घालून नंतर सभात्याग केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम ५ मिनिटे आणि नंतर ३० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
मराठा आरक्षणावर महत्त्वाच्या सूचनांविषयी चर्चा चालू आहे. यासाठी सभापतींनी ‘केवळ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बोलण्यासाठी संधी दिली आहे’, असे सांगून शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘इतर कामकाजावर चर्चा करायची नाही’, असे ठरले असतांना असे विषय का घेतले जातात ?’, असा प्रश्न उपस्थित केला. कामकाजात सहभागी होण्यास अनुमती नाकारल्यामुळे विनायक मेटे यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ चालू केला. यानंतर विरोधकांच्या गदारोळातच सभापतींकडून इतर विधेयके उरकून घेण्याचे काम चालू होते. आमदार सदाभाऊ खोत, भाई गिरकर, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर आदींनी मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजी केली.
सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानपरिषदेत संमत
सोलापूर येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ मिळाल्याविषयी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानपरिषदेत संमत झाला. ‘डिसले यांना मिळालेला पुरस्कार ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला मिळालेल्या रकमेतील अर्धी रक्कम इतर शिक्षकांना वाटून त्यांनी दातृत्व दाखवले’, असे मत संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले. अभिनंदनाचा प्रस्ताव संमत होताच ‘शासनाने डिसले यांना २ वेतनवाढ देण्यात यावी’, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.