शेतकरी आंदोलन पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल चालवत आहेत !
मध्यप्रदेशातील भाजप सरकारच्या मंत्री उषा ठाकूर यांचा दावा
इंदूर (मध्यप्रदेश) – पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवत आहेत. साम्यवादी विचारसरणीचे लोक आणि ‘टुकडे – टुकडे गँग’ यामध्ये सहभागी झाली असून शेतकर्यांच्या परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा मध्यप्रदेशच्या पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म खात्याच्या मंत्री उषा ठाकूर यांनी केला आहे. ‘या प्रयत्नामध्ये ते कधीही यशस्वी होणार नाहीत. रचलेला खोटा कट फार काळ झाकून रहाणार नाही’, असेही ठाकूर यांनी म्हटले.
उषा ठाकूर यांनी सांगितले की, कृषी कायद्यातील भ्रम दूर करण्यासाठी भाजप जनजागृती मोहीम राबवत आहे. यासाठी एक मोठे नियोजन करण्यात आले आहे. भाजपचे मोठे नेते शेतकर्यांना कायद्याची माहिती आणि त्याचे लाभ सांगतील. (भाजपने हे आधीच का केले नाही ?, असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)