दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन
सरकारचे साहाय्य मिळत नसल्याविषयी मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला
पुणे – येथील कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. पत्रकार रायकर यांचे निधन झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेले साहाय्य अद्यापही मिळाले नसल्याचे सांगत मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे साहाय्य करणार अशी घोषणा केली होती; मात्र राज्यात जवळपास ५० पत्रकारांचे बळी कोरोनाने घेतल्यानंतरही एकाही पत्रकाराच्या नातेवाइकांना सरकारने साहाय्य केलेले नाही, असे मराठी पत्रकार परिषदेचे म्हणणे आहे. (प्रशासन याविषयी काय करणार आहे, ते लवकर स्पष्ट करणे अपेक्षित ! – संपादक) या संदर्भात रायकर कुटुंबियांना तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी परिषदेने सरकारकडे एका पत्रकाद्वारे मागणी केली आहे.