देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कर्महिंदु बना ! – निरंजन चोडणकर, हिंदु जनजागृती समिती
वेंगुर्ला आणि शिरोडा येथील युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान’
सिंधुदुर्ग – आज विविध प्रकारच्या आक्रमणांनी देव, देश आणि धर्म संकटात आले आहेत. यांचे रक्षण करायचे असेल, तर आपण केवळ जन्महिंदु असून चालणार नाही, तर कर्महिंदु बनले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी केले.
युवकांमधील शौर्य जागृत करणे, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागृती करणे, आपत्काळाच्या दृष्टीने साधनेचे महत्त्व आणि जीवनातील स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व विषद करण्यासाठी जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि शिरोडा या भागांतील युवा धर्मप्रेमींसाठी ९ डिसेंबर २०२० या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते. या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानास हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनुश्री गावस्कर आणि श्री. वीरेश माईणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नीना कोळसुलकर यांनी केले.
या वेळी सहभागी युवा धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. चोडणकर यांनी सांगितले, ‘‘विज्ञान अशाश्वत आहे; कारण त्यात सातत्याने पालट होत असतो. केवळ ईश्वर म्हणजे धर्म शाश्वत आहे, हे जाणून आपण धर्माचे आचरण केले पाहिजे, तरच पुढच्या कठीण काळाला आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो. धर्मातच संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आहे. ‘कालमहात्म्यानुसार धर्मरक्षण हे आपले कर्तव्य असून त्यासाठी मी योगदान दिले पाहिजे’, या जाणीवेने युवकांनी काम केले पाहिजे. युवाशक्तीच देशामध्ये परिवर्तन करू शकते. शौर्याच्या उपासनेमुळेच बाजीप्रभु देशपांडे, तानाजी मालुसरे हिंदवी स्वराज्यासाठी त्याग करू शकले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींचा आदर्श समोर ठेवून आपण सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे.’’
कोरोना महामारीच्या काळात भारतीय संस्कृतीची महानता जगाने आणली !
‘कोरोना महामारीच्या काळात अनेक राष्ट्रांनी ‘नमस्कार’ करून हिंदु धर्मानुसार आचरण केले. मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्याचे महत्त्व अनेकांच्या लक्षात आले. आपण तर भारतीय आहोत. आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. ‘हॅलो’ ऐवजी ‘नमस्कार’ म्हणायला हवे. दैनंदिन जीवनात आपण धर्माचरणानुसार कृती केली, तर येणार्या काळात धर्म म्हणजे साक्षात् ईश्वरच आपले रक्षण करणार आहे’, असे श्री. चोडणकर यांनी या वेळी सांगितले.
क्षणचित्रे
१. या व्याख्यानाला उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी विषय ऐकल्यावर ‘हर हर महादेव’ असा जयघोष ऑनलाईन ‘चॅट बॉक्स’मध्ये लिहून आपला प्रतिसाद दर्शवला.
२. व्याख्यानात मांडलेल्या विषयामुळे जागृत होऊन ‘शौर्य जागृती सप्ताह’ चालू करण्याची मागणी धर्मप्रेमींनी केली.