गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्यात गोमांस विक्रीची दुकाने बंद
कर्नाटक सरकारने गोहत्या बंदी कायदा संमत केल्याचे प्रकरण
गोमांस उपलब्ध होण्यासाठी विक्रेते आणि चर्चसंस्था यांचा शासनावर दबाव
वास्तविक गोवा सरकारने स्वतःहूनच गोहत्या आणि गोमांस विक्री बंद करायला हवी ! येथे गोमांसाच्या उपलब्धतेअभावी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत, तर ख्रिस्त्यांचा एवढा थयथयाट कशाला ?
पणजी, १४ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक नुकतेच संमत केले आहे. कर्नाटकच्या या गोहत्याबंदी कायद्यामुळे गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासू लागल्याने गोमांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. आगामी नाताळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमांसाचा पुरवठा पुन्हा सुरळीत व्हावा, यासाठी गोवा शासनावर दबाव आणण्यासाठी गोमांस विक्रेत्यांनी चर्चसंस्थेच्या प्रतिनिधींची भेट घेतली आहे.
गोव्यात गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोमांस विक्रीची दुकाने १२ डिसेंबरपासून बंद आहेत. नाताळाला प्रारंभ होण्यासाठी १५ दिवसच बाकी असल्याने यापुढे गोमांसाचा तुटवडा होऊ नये, यासाठी गोमांस विक्रेते जिल्हा पंचायतीची मतमोजणी झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून त्यांच्यावर दबाव आणण्याच्या सिद्धतेत आहेत. गोमांसाच्या तुटवड्याच्या सूत्राला अनुसरून काही गोमांस विक्रेत्यांनी चर्चसंस्थेची एक शाखा असलेल्या ‘सामाजिक न्याय आणि शांती मंडळा’चे कार्यकारी सचिव फादर सावियो फर्नांडिस आणि ‘कारितास गोवा’चे संचालक फादर मेव्हरिक फर्नांडिस यांची भेट घेतली आहे. याविषयी फादर सावियो फर्नांडिस म्हणाले, ‘‘आमचा गोमांस विक्रेत्यांना पाठिंबा आहे. आम्ही गोमांस विक्रेत्यांसमवेत बैठक घेतली आहे. याविषयी आम्ही शासनाला लवकरच एक निवेदन देणार आहोत.’’ ‘कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशन’ या गोमांस विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अन्वर बेपारी म्हणाले, ‘‘शासनाला देण्यासाठी निवेदन आम्ही सिद्ध केलेले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.’’