मुंबई-गोवा महामार्गावरील अशुद्ध फलकांद्वारे मराठीची पायमल्ली करणार्यांवर कारवाई करा !
महामार्गावरील मराठी व्याकरणाच्या चुका असलेले फलक पालटण्याची मागणी
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. तरीही आता ठेकेदार आस्थापनाकडून फलक सिद्ध करतांना चुका झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आस्थापन यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये ८ डिसेंबर २०२० या दिवशी प्रसिद्ध झाले होते. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गाचे काम चालू झाल्यापासून आतापर्यंत स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी आदींनी कामाच्या दर्जावरून वेळोवेळी टीका केली आहे, तसेच याविषयी आंदोलनेही झाली आहेत. आता महामार्गावर लावण्यात आलेल्या फलकांमधील मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुकांची भर दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार आस्थापनाकडून करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील मराठी भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी आस्थापनासह संबंधित अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्यासह चुकीचे फलक त्वरित पालटून घ्यावेत.
जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना शिवसेना विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत बालम आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुरेश दाभोळकर, गजानन मुंज आणि रवींद्र परब उपस्थित होते.