सत्ताधारी भाजपचे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर निर्विवाद बहुमत
भाजप – ३३, काँग्रेस – ४, मगोप – ३, आप – १, राष्ट्रवादी काँग्रेस – १ आणि अपक्ष – ७ जागांवर विजयी
पणजी, १४ डिसेंबर (वार्ता.) – सत्ताधारी भाजपने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे १९, काँग्रेसचा १, तर अपक्ष ५ उमेदवार विजयी झाले, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे १४, काँग्रेसचे ३, मगोपचे ३, ‘आप’चा १, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि अपक्ष २ उमेदवार विजयी झाले आहेत. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतींच्या एकूण ५० पैकी ४८ मतदारसंघांसाठी ही निवडणूक घेण्यात आली आणि यामध्ये ५६.८२ टक्के सरासरी मतदान झाले होते. भाजपच्या एका उमेदवाराची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे, तर एका मतदारसंघामध्ये उमेदवाराच्या मृत्यूमुळे तेथील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे.
मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. राज्यभरात १५ मतमोजणी केंद्रांमध्ये मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर प्रारंभापासून काही ठिकाणी अपक्ष, तर बहुतांश ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी आघाडी मिळवली होती.
भाजपचे उमेदवार विजयी झालेले मतदारसंघ : धारगळ, दवर्ली, शेल्डे, खोला, शिवोली, होंडा, सावर्डे, रिवण, उसगाव-गांजे, कारापूर-सर्वण, ताळगाव, हळदोणा, केरी, शिरसई, बेतकी-खांडोळा, गिरदोली, बार्शे, चिंबल, सुकूर, मये, नगरगाव, बोरी, पैंगीण, हणजूण, धारबांदोडा, पाळे, रईस-मागोस, खोर्ली, कळंगुट, शिरोडा, सेंट लारेन्स आणि तोर्से
अपक्ष उमेदवार विजयी झालेले मतदारसंघ : राय, कोलवाळे, कुठ्ठाळी, लांटबार्से, मोरजी, हरमल आणि पेन्ह-द-फ्रान्स काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले मतदारसंघ : नुवे, सांता-क्रूझ, कुडतरी आणि वेळ्ळी मगोपचे उमेदवार विजयी झालेले मतदारसंघ : कुर्टी, वेलींग-प्रियोळ आणि कवळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला मतदारसंघ : कोलवा आम आमदी पक्षाचा उमेदवार विजयी झालेला मतदारसंघ : बाणावली |
जिल्हा पंचायत निकालासंबंधी काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी
१. मोरजी, हळदोणा, सांताक्रूझ, सुकूर आणि पेन्ह-द-फ्रान्स या मतदारसंघांतील निकाल तेथील राजकीय समीकरणांमध्ये पालट होत असल्याचे दर्शवत आहे.
२. बाणावली मतदारसंघात हेंजल फर्नांडिस याने ४३४ या अल्प मताधिक्याने विजय मिळवला. या निकालामुळे ‘आप’ने राज्यात पहिल्यांदाच खाते उघडले आहे.
३. सेंट लॉरेन्स जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. या निकालानंतर या ठिकाणी फेरमतमोजणी घेण्यात येत आहे.
४. केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपूत्र सिद्धेश श्रीपाद नाईक भाजपच्या तिकिटावर खोर्ली मतदारसंघात विजयी झाले.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
पक्षावर विश्वास दाखवणार्या गोमंतकियांसमोर मी नतमस्तक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
माझ्या नेतृत्वाखाली राज्यात कार्यरत असलेला भाजप आणि सरकार यांच्यावर विश्वास दाखवणार्या गोमंतकियांसमोर मी नतमस्तक होत आहे. याच आत्मविश्वासाच्या आधारावर गोवा ‘स्वयंपूर्ण’ बनवूया. ग्रामीण भागातील गोमंतकियांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे.
जिल्हा पंचायतीच्या निकालामुळे वर्ष २०२२ मधील विधानसभेचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
जिल्हा पंचायतीच्या निकालामुळे वर्ष २०२२ मधील विधानसभेचे चित्र डोळ्यांसमोर उभे रहात आहे. वर्ष २०२२ मध्ये भाजपच पुन्हा सरकार स्थापन करणार, यामध्ये दुमत नाही.
हा तर आरंभ आहे !- अरविंद केजरीवाल, आपचे नेते तथा देहलीचे मुख्यमंत्री
‘आप’ गोमंतकियांचा विश्वास संपादन करण्यास आणि अपेक्षा पूर्ण करण्यास समर्थ आहे. ‘आप’चा हा गोव्यातील आरंभ आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पक्ष कार्यकर्ते यांचे अभिनंदन
भाजपने दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा मतदारसंघांवर निर्विवाद बहुमत प्राप्त केल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे आणि पक्ष कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे. ‘या विजयामुळे जनतेने शेतकरी, मजूर, महिला आणि युवक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि पक्षाचे धोरण यांवर विश्वास दाखवला आहे’, असे ते म्हणाले.