पर्यावरण आणि निसर्ग संपदा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – सुभाष पुराणिक, वन्यजीव अधिकारी

आंबोली येथे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा

माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेच्या वतीने आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन’ साजरा करण्यात आला.

सावंतवाडी – सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे, तसेच आहे ती निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सिंधुदुर्गचे माजी साहाय्यक वनसंरक्षक आणि पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनोने) वर्ष २००२ मध्ये ‘११ डिसेंबर’ हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून घोषित केला. त्यानुसार महादेवगड पॉईंट, आंबोली येथे माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वतपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विधीवत पर्वतपूजन करण्यात आले.

या वेळी वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक म्हणाले, ‘‘कोकण आणि त्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग म्हणजे जैवविविधतेचा सागर आहे. आज विकासाच्या नावाखाली निसर्ग संपत्तीची हानी होत आहे. ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ या संस्थेच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धनाची चळवळ वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हे कौतुकास्पद आहे.’’