फोंडा वीजकेंद्राची तातडीने दुरुस्ती करा ! – औद्योगिक वीजग्राहकांची मागणी
फोंडा – वीज केंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे (जनित्राचे) आयुष्य सरासरी २५ ते ३० वर्षांचे असते; परंतु फोंडा वीजकेंद्रातील बहुतेक ट्रान्सफॉर्मर हे ५० वर्षे जुने असून या वीजकेंद्राला मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची आणि हे वीजकेंद्र अद्ययावत् करण्याची तातडीने आवश्यकता आहे, असे औद्योगिक वीजग्राहकांचे म्हणणे आहे. फोंडा वीजकेंद्रावर कुंडई, मडकई आणि बेतोडा औद्योगिक वसाहत, तसेच वेर्णा उपकेंद्र, कदंब उपकेंद्र, शेल्डे उपकेंद्र आणि संपूर्ण दक्षिण गोवा घरगुती वीजग्राहक, असा विजेचा भार आहे. फोंडा वीजकेंद्रामध्ये १००/५०/४० एम्.व्ही.ए. क्षमतेचे एकूण ८ ट्रान्सफॉर्मर आहेत. यांपैकी निम्म्याहून अधिक ट्रान्सफॉर्मर ५० वर्षे जुने असून नियमानुसार कालबाह्य झाले आहेत. कोणत्याही वेळी फोंडा वीजकेंद्रावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे औद्योगिक वीजग्राहकांचे म्हणणे आहे.