‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।
‘हिंदुराष्ट्र’ हे सत्य चिरंतन वादातित हे सत्य असे ।
‘ग्रीक, रोम अन् बाबिलोनिया उत्कर्षा जग दिपवीले
परंतु आता नाव तयांचे इतिहासी केवळ उरले ॥ १ ॥
हिंदुराष्ट्र पण अमर असे हे अनादि काळहि सांगतसे
अमरत्वाचे कारण नकळे जग आश्चर्या करीतसे ॥ २ ॥
सहस्त्र वर्षे आक्रमूनही भारत नष्टहि होत नसे
‘मिशन’ तयाचे पूर्ण न झाले ‘नरेंद्र’ कारण सांगतसे ॥ ३ ॥
भौतिकता सर्वस्व मानिता मानव जीवन अपूर्णसे
अध्यात्माचा पाया देणे राष्ट्र्राचे या कार्य असे ॥ ४ ॥
वेद पुराणे संतचरित्रे भारत रामायणा स्मरा
तेव्हा सूज्ञा ध्यानी येइल ‘धर्म’ प्राण हा असे खरा ॥ ५ ॥
‘धर्म’ कल्पना ही हिंदूंची पर्यायी त्या शब्द नसे
सकल ‘मतांची’ माळ गुंफिण्या शक्ति पुरेशी त्यात असे ॥ ६ ॥
करता त्या आवाहन ‘धर्मा’ जागृत भारत होत असे
त्या डावलता भारतीय तो उच्चरवाने घोरतसे ॥ ७ ॥
मानवतेच्या धर्मासाठी ‘हिंदू’ हा प्रतिशब्द असे
‘हिंदुधर्म श्रेष्ठत्व’ मानिले सत्य शिकागो सांगतसे ॥ ८ ॥
परंतु बुद्धी भ्रमिष्ट झाली कारण इंग्रज त्यास असे
कारण नाही तोही केवळ अमुचीही ‘विस्मृती’ असे ॥ ९ ॥
निधर्मितेचा डंका पिटवुनि मरगळ अमुची जात नसे
‘धर्मस्थापना’ हा हिंदूंचा परंपरेने ‘धर्म’ असे ॥ १० ॥
‘मानवमूल्ये’ अर्थ असे हा ऋषीमुनींच्या धर्माचा
‘रिलिजन’ त्यासी आम्ही मानुन गोंधळ केला सर्वांचा ॥ ११ ॥
किती करंटे ‘त्यांचे’ वंशज धर्महि त्यांनी निषेधला
‘निधर्मि’ भारत करण्यासाठी गलका ‘बेंबीतुन’ केला ॥ १२ ॥
काय लागले फळ त्या यत्ना भारतभूला विभाजिले
धर्म त्यागता ध्वजही गेला एकतेसही दुभंगिले ॥ १३ ॥
धर्मकारणे देश खंडुनहि झोप हि आमुची जात नसे
तरिही हिंदूराष्ट्र मानण्या तयार आम्ही होत नसे ॥ १४ ॥
‘हिंदुभूमि सम्राट’ (टीप १) असे मी ‘बाबरनामा’ (टीप २) लिहीतसे
‘श्रींच्या’ इच्छे शिवाजीराजा हिंदुराज्यही स्थापितसे ॥ १५ ॥
‘राष्ट्रकल्पना’ नवी नसे ती वेदापासून ज्ञात असे
‘हिंदुराष्ट्र’ हे सत्य चिरंतन वादातित हे सत्य असे ॥ १६ ॥
जागृत व्हा हो हिंदु बंधुनो ‘हिंदूराष्ट्र्रा’ जयकारा
आपुली भाषा आपुल्या देशा धर्माचा अभिमान धरा ॥ १७ ॥
संघटनेला बाधा येइल अशा विकृती टाकुनि द्या
संघभावना सुदृढ होइल ‘तीच संस्कृती’ जाणुनि घ्या ॥ १८ ॥
स्मरा केशवा, शिवा, माधवा, विनायका, गुरु गोविंदा
चला अनुसरा सहर्ष अर्पा सर्वस्वा अपुल्या समिधा ॥ १९ ॥
‘व्यक्ती तितुके देव’ असे जरि ‘समान दैवत’ नित्य असे
पूजा ‘भारतमाते’ करणे संघ युगाचा मंत्र असे ॥ २० ॥
पूजन आम्ही कसे करावे अपुल्या भारतमातेचे
चला विचारा तिजला आता ‘काय’ तुला गे आवडते ॥ २१ ॥
विचारता तिज काय म्हणे ती लक्ष देऊन ऐका हो
परंपरेचे भान ठेवता उत्तर ऐकू येइल हो ॥ २२ ॥
नकोत मजला उदक फळे ती नकोत कुसुमे अन् पाने
नको भोजने, नको शर्करा, नको पशूंची बलिदाने ॥ २३ ॥
प्रसन्न होण्या तुम्हावरी मी ‘काय हवे मज’ जाणुनि घ्या
भारतमाता स्पष्ट सांगते ‘आपुलीच’ बलिदाने द्या ॥ २४ ॥
तीहि नको वृद्धांची जर्जर गलितगात्र निःसत्त्वांची
सबल सुगंधित पौरुषशाली तरुणांची अन् तरुणींची ॥ २५ ॥
धर्मासाठी प्राण अर्पुनी धर्मवीर संभाजीने
जनसामान्या जागृत केले बलिदानी स्फुल्लिगांने ॥ २६ ॥
लक्ष वीर ते उभे ठाकले प्राणपणाने लढण्याला
बोलुनि ‘हरहर महादेव’ हो औरंग्यासहि गाडियला ॥ २७ ॥
कोण म्हणे, संभाजी वधिला अमर तयाची कीर्ति असे
देव, देश अन् धर्म रक्षिण्या स्फूर्ति पिढ्यांना देत असे ॥ २८ ॥
चला हिंदुनो संघटीत व्हा भारतमाते जयकारा
ऋषीमुनींच्या अपूर्ण स्वप्ना याचि देहि साकार करा ॥ २९ ॥
पुनश्च आपुले हिंदुराष्ट्र हे जग नेतृत्वा करील का ?
प्रयत्न होता योग्य दिशेने फळ त्या निश्चित येइ न का ? ॥ ३० ॥
उणिवा दिसतील काव्य म्हणोनी दोषा तुम्ही पाहु नका
नव्हे कवी मी माहित मजला भाव तयाचा तुम्ही पहा ॥ ३१ ॥
टीप १ आणि २ : मुगल सम्राट बाबराने (स्वतःची) आत्मप्रौढी सांगणारे ‘बाबरनामा’ नावाचे एक पुस्तक लिहून घेतले. त्यात तो स्वतःला ‘हिंदुस्थानच्या म्हणजे भारताच्या भूमीचा सम्राट’ म्हणवतो. त्यात तो भारताचा उल्लेख ‘हिंदु भूमी’ असाच करतो; परंतु बाबर जरी स्वतःला तात्कालिक सम्राट म्हणवत असला, तरी खरे हिंदु भूमी सम्राट छत्रपती शिवाजी महाराजच होत; कारण श्रींच्या इच्छेखातर त्यांनीच हिंदूंच्या या भूमीत हिंदूंचे राज्य स्थापन केले. तेव्हा ‘अंतिम विजय हिंदूंचाच होतो’, हे यावरून लक्षात येते.’
– श्री. जयंत रानडे, विश्रामबाग, सांगली. (दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक)
‘२९ नोव्हेंबरच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगली येथील श्री. जयंत रानडे (दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक) यांचे नावाने कविता प्रसिद्ध झाली आहे. त्या कवितेमध्ये संपादन करतांना कार्यकर्त्यांकडून अनावश्यक पालट करण्यात आले आहेत. या चुकीसाठी क्षमस्व आहोत. संबंधित कार्यकर्ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घेत आहेत. श्री. रानडे यांनी लिहिलेली मूळ कविता येथे पुनर्प्रकाशित करत आहोत. – संपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’ (१२.१२.२०२०) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |