आघाडी सरकारला फार काळ दबावाचे राजकारण करता येणार नाही ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
मुंबई – महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मोगलाईचे राज्य चालू आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर खटले प्रविष्ट करण्यात आले. अधिवेशन चालू असतांना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी येथे येणार्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका. असे फार काळ तुम्हाला दबावाचे राजकारण करता येणार नाही, असे वक्तव्य विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी १४ डिसेंबर या दिवशी येथे केले.
ते पुढे म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात सरकारच्या विरोधात बोलले, कृती केली की, त्यांना कारागृहात टाका, त्यांच्यावर खटले प्रविष्ट करा, असे चालू आहे. आज मराठा समाजाच्या मुलांवर १०-२० खटले प्रविष्ट केेले असतांनाही ते आंदोलन करत आहेत. न्याय मागत आहेत. ठिकठिकाणी आंदोलन करायला गेले, तर त्यांना अनुमती दिली जात नाही. या देशामध्ये जेवढी आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती आंदोलने आणखी ताकदीने उभी राहिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदेेश टंकलेखन होण्याअगोदर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेच्या प्रवेशाला स्थगिती दिली. एवढी कुठली घाई लागली आहे तुम्हाला ? खरंतर त्या दिवसात प्रवेश प्रक्रिया होऊन गेली असती; परंतु न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर इकडे स्थगिती दिली. याचा अर्थ मराठा समाजाप्रती त्यांची मानसिकता आणि भावना काय आहे ?, हे दिसून येते. हे सर्व समाजाला कळायला लागले आहे.