हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया ! – सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या २४८ व्या स्मृतीस अभिवादन
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला; पण हा विराट विजयाचा इतिहास आपल्या शिक्षणव्यवस्थेत शिकवला जात नाही. हिंदूंचे शौर्य जागवले जात नाही. बाजीराव पेशवे म्हटले की, त्यांचा अटकेपार झेंडे लावणारा पराक्रम न आठवता मस्तानीची आठवण काढली जाते, अशी दुर्दैवी मानसिकता निर्माण केली गेली आहे. लॉर्ड मेकॉले याने पाश्चात्त्य शिक्षणपद्धती आणून हिंदूंमध्ये त्यांचा धर्म आणि संस्कृती यांविषयी स्वाभिमान रहाणार नाही, अशी सोय केली. इस्रायलसारखा देश त्यांचा इतिहास ज्वलंतपणे त्यांच्या नागरिकांसमोर मांडत आला आहे. त्यांच्या इतिहासाचे मोठे संग्रहालयच त्यांच्या देशात आहे. म्हणूनच तेथील आबालवृद्ध अतिशय राष्ट्राभिमानी आहेत. आपणही हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले, तसेच त्यांच्या शौर्यशाली इतिहासाचे जागरण करण्यात आले.
श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, प्रत्येक मोगल आक्रमकाने मंदिरे फोडली, गोमाता आणि हिंदु स्त्रिया यांच्यावर अत्याचार केले अन् हिंदूंचे खच्चीकरण केले. आजही लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, धर्मांतर या माध्यमांतून हिंदूंवर आघात होत आहेत. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीविषयी मतभेद असल्याने हिंदू विभागले जात आहेत. राष्ट्रपुरुष जाती आणि प्रांत यांच्यात वाटले गेले आहेत. हे थांबायला हवे. स्वातंत्र्याला ७३ वर्षे लोटूनही गावांना असलेली मोगल आक्रमकांची नावे ही गुलामगिरीची प्रतीके आहेत. ती पालटून स्वाभिमान जागवला पाहिजे.
आजच्या तरुणांचे आदर्श श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत माधवराव पेशवे असायला हवेत ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले की, पानिपतमध्ये हिंदूंची जी हानी झाली, तिचा प्रतिशोध घेण्यासाठी उत्तरेकडे ५० सहस्र सैन्य पाठवून देहलीमध्ये हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी ‘उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रे मुक्त करावीत’, असे आदेश दिले होते. हिंदूंनी घेतलेल्या प्रतिशोधाचा इतिहास दडपला जातो. माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवेपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुढील ३ मासांत निजामाने आक्रमण केले. त्याने देवळे फोडली, मूर्ती तोडल्या. त्या वेळी माधवरावांनी अन्य कुणावर न अवलंबून रहाता त्याच्याशी लढाई करायचे ठरवले. वयाच्या १६ व्या वर्षी माधवराव पेशवे यांनी पानिपतचा सूड घेण्याचा केलेला हा निर्णय पाहून त्यांच्यातील क्षात्रवृत्ती शिकायला मिळते. आज या वयाचे किती तरुण असा विचार करतील ? या वयाची अनेक मुले ‘पबजी’ खेळत असतात आणि बेशुद्ध पडतात अशी अवस्था आहे. हे पालटण्यासाठी आजच्या तरुणांचे आदर्श श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत माधवराव पेशवे असायला हवेत.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील कोळवडी, थेऊर, भोसरी, आळंदी, तळेगाव, हडपसर, सिंहगड, सासवड या भागांतून १०० हून अधिक राष्ट्र-धर्म प्रेमी यांसह थेऊर गणपति मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. आनंद महाराज तांबे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, तसेच अन्य मान्यवरही उपस्थित होते. ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांनी कार्यक्रमात श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा शौर्यशाली इतिहास सर्वांसमोर सविस्तरपणे सांगितला.