सावंतवाडीत टेम्पोचालकावर प्राणघातक आक्रमण केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
वाढती गुन्हेगारी ही पोलिसांची नामुष्की !
सावंतवाडी – शहरातील जिमखाना मैदानाजवळ प्राणघातक आक्रमण करून टेम्पोचालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चंदन उपाख्य सनी अनंत आडेलकर (रहाणार सावंतवाडी) आणि अक्षय अजय भिके (रहाणार गोवा) या २ संशयितांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने दोघांना १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) हे आयशर टेम्पोतून ग्रॅनाईट आणि टाईल्स घेऊन गगनबावडा येथून १२ डिसेंबरला पहाटे ४.३० वाजता सावंतवाडी येथे आले. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या २ व्यक्तींनी त्यांचा टेम्पो अडवला आणि पाटील यांच्याकडे भ्रमणभाष संच आणि पैसे यांची मागणी केली. या वेळी पाटील यांनी त्यांच्याकडील भ्रमणभाष त्यांना दिला; मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने संबंधित व्यक्तींशी बाचाबाची झाली. त्यामुळे त्या दोघांनी पाटील यांच्या पोटावर आणि गळ्यावर चाकूने आक्रमण केले होते. या आक्रमणात पाटील गंभीर घायाळ झाले. पोलिसांनी शहरातील सर्व ‘सीसीटीव्ही फूटेज’ आणि आक्रमणकर्त्यांचे वर्णन यांवरून शोध घेतला.