मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
अविश्वास ठराव आणणार्या २७ जणांच्या घटनात्मक अधिकाराविषयी दीपक ढवळीकर यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह
पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) – मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या विरोधात पक्षातील २७ सदस्यांच्या एका गटाने अविश्वास ठराव आणला आहे. अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी अविश्वास ठराव आणणार्या २७ जणांच्या घटनात्मक अधिकाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मगोपची केंद्रीय समिती आणि पक्षाचे अध्यक्षपद यांसाठी पुढील १-२ मासांत निवडणूक घेतली जाणार असल्याचे दीपक ढवळीकर यांनी सांगितले आहे.
वर्ष २०१९ मध्ये समितीची निवडणूक न घेणे, वर्ष २०१७ मध्ये २७ सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न न सोडवणे, वर्ष २०२० साठी पक्षाध्यक्षपद अनधिकृतपणे कह्यात घेणे, मागील ६ वर्षे पक्षाची महासभा न घेणे (वर्ष २०१७ वगळता) या आरोपांखाली अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. या ठरावाविषयी दीपक ढवळीकर म्हणाले, ‘‘पक्षाच्या घटनेनुसार अविश्वास ठराव आणता येत नाही. केंद्रीय समितीसाठीची निवडणूक चालू वर्षी होणार होती; मात्र ती जिल्हा पंचायत निवडणूक आणि कोरोना महामारी यांमुळे पुढे ढकलण्यात आली. पक्षाच्या महासभेचे ७०० सदस्य आहेत आणि महामारीच्या काळात या सर्व सदस्यांना घेऊन आमसभा घेता येणे शक्य नव्हते.’’
(सौजन्य : प्रूडेन्ट)