भक्तांच्या निधीतून अयोध्येतील श्रीराममंदिर उभे राहील ! – चंपत राय, महासचिव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास
मुंबई – अयोध्येतील नियोजित श्रीराममंदिर भक्तांच्या आर्थिक सहकार्यातून उभे रहाणार आहे. त्यासाठी संक्रांतीपासून निधीसंकलन चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव आणि विश्व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष श्री. चंपत राय यांनी १२ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
याविषयी अधिक माहिती देतांना श्री. चंपत राय म्हणाले की,
१. मंदिराचे प्रारूप थोडे वाढवण्यात आले असून त्यानुसार सर्व आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या उभारणीसाठीची सिद्धता चालू आहे. मृदा परीक्षणही करण्यात आले. गर्भगृहाच्या पश्चिमेस शरयू नदीचा जलप्रवाह आणि जमिनीखाली भुरभुरीत वाळू अशी येथील भौगोलिक स्थिती आहे.
२. मंदिराच्या उभारणीचे काम ‘लार्सन अँड टुब्रो’ या आस्थापनाकडून करण्यात येणार आहे.
३. आस्थापनाला सल्ला देण्यासाठी ‘टाटा कन्सल्टंट’ संस्थेच्या अभियंत्यांची निवड करण्यात आली आहे. याविषयी सर्व प्रकारचे प्रबंध झाले असून मंदिराच्या वास्तूचे उत्तरदायित्व कर्णावती येथील श्री. चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
४. सोमपुरा यांच्या आजोबांनी सोमनाथ मंदिर बांधले होते. स्वामी नारायण परंपरेची अनेक मंदिरे त्यांनी बांधली आहेत. दगडांपासून मंदिरे बांधणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
५. सध्या अयोध्येच्या वालुकामय भूमीवर भक्कम पायाच्या दगडी मंदिराचे बांधकाम कसे करावे ? यावर विचार चालू आहे. पुढील ३ वर्षांत हे मंदिर उभे राहील, अशी आशा आहे.