बिंदूदाबनाची सेवा परिणामकारक होण्यासाठी उपचारकामध्ये शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव असणे आवश्यक आहे !
१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर बिंदूदाबनाचे उपचार करतांना जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती
१ अ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांच्यावर बिंदूदाबन केल्यावर त्यांचा ७० ते ८० टक्के इतक्या प्रमाणात त्रास उणावणे : ‘वर्ष २०१९ मध्ये अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे रामनाथी आश्रमात आले होते. ते सेवेनिमित्त सतत ठिकठिकाणी जातात. अधिवेशन काळातही ते दिवसभर कार्यक्रमात व्यस्त असायचे आणि रात्री सत्संगात सहभागी असायचे. त्यांना पुष्कळ शारीरिक वेदना व्हायच्या. मला त्यांच्यावर बिंदूदाबन करण्याची सेवा मिळाली होती. ते मला दुपारी बिंदूदाबन करण्यासाठी बोलवायचे. मी प्रतिदिन त्यांच्या शरिरावरील आवश्यक ते सर्व बिंदू दाबल्यावर त्यांना ७० ते ८० टक्के इतक्या प्रमाणात बरे वाटायचे.
१ आ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर बिंदूदाबन करत असतांना पुष्कळ भावजागृती होणे आणि त्यांच्यावर बिंदूदाबन करतांना स्वतःतील शरणागतभावात वृद्धी झाल्यावर त्यांना होत असलेल्या वेदना नाहीशा होणे : एके दिवशी मी त्यांच्यावर बिंदूदाबन करत असतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. मी शरणागतभावात होतो. त्यांच्या शरिरावर प्रत्येक वेळी दाब देतांना माझ्यातील शरणागतभावात वृद्धी होत होती. त्या दिवशी अल्प वेळेतच त्यांना होत असलेल्या वेदना न्यून होऊन नंतर त्या दूर झाल्याचे त्यांनी मला सांगितले. ‘उपचार करतांना मनात भाव ठेवल्यावर परिणाम अधिक होतो’, हे देवाने मला लक्षात आणून दिले. तेव्हा माझी देवाप्रती अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त झाली.
२. साधकांवर बिंदूदाबनाचे उपचार नामजपासहित करत असतांना देवाप्रती पुष्कळ शरणागती वाढणे, साधकाच्या वेदना न्यून होणे आणि उपचारांची परिणामकारकता वृद्धींगत होणे
जून २०१९ मध्ये मी एका साधकांवर बिंदूदाबनाचे उपचार नामजपासहित करत असतांना मला देवाप्रती पुष्कळ शरणागती वाटत होती. मी तसा भाव मनात ठेवल्यापासून काही क्षणांतच रुग्ण साधकाच्या वेदना उणावल्या आणि त्यांना आराम जाणवू लागला. तेव्हा ‘मनातील भावामुळे उपचारांची परिणामकारकता वृद्धींगत होते’, हे माझ्या लक्षात आले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत बसून नामजप करतांना मन एकाग्र होणे
३ अ. सेवा आणि साधना यांविषयीची सूत्रे आपोआप सुचणे, त्याविषयी कर्तेपणा न जाणवणे अन् सर्वांप्रती कृतज्ञता वाटणे : जुलै २०१९ मध्ये मी एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत बसून नामजप करत होतो. तेव्हा माझे मन एकाग्र झाले आणि मला सेवा अन् साधना यांविषयी काही सूत्रे आपोआप सुचू लागली. अन्य वेळी मला सेवेविषयी काही न सुचणे आणि काही न आठवणे, असे त्रास होतात. त्यामुळे माझ्यासाठी हे नवीनच होते. ही सूत्रे सूचत असतांना मला हलकेपणा जाणवत होता. मला सूत्रे सुचण्याची गती अधिक होती; पण मनात त्याविषयी कर्तेपणाची जाणीव नव्हती. मला देव आणि साधक यांच्याप्रती कृतज्ञता वाटत होती.
३ आ. आपल्याला जे ज्ञान मिळते, त्याची प्रगल्भता कृतज्ञताभावावर अवलंबून असणे : ‘विचार सुचतांना नेमकी काय प्रक्रिया घडते ?’, याचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मनात आलेल्या विचारानंतर कृतज्ञताभाव सूक्ष्म प्रमाणात वाढायचा आणि नंतर पुढील सूत्र सुचायचे.’ त्यामुळे एक सूत्र सुचल्यावर मी मुद्दाम कृतज्ञताभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला पुढील सूत्रे गतीने सुचू लागली. असे २ – ३ वेळा झाले. प्रत्येक वेळी कृतज्ञताभाव वाढल्यावर सूत्रांची गती आणि सूक्ष्मपणा अधिक वाढत होता, तसेच चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘सूत्रे जितकी सूक्ष्म स्तरावर सुचत होती, तितकी ती परिपूर्ण वाटत होती.’ यावरून ‘आपल्याला जे ज्ञान मिळते, त्याची प्रगल्भता कृतज्ञताभावावर अवलंबून असते’, असे माझ्या लक्षात आले.
या अनुभूतींमधून माझ्या लक्षात आले, ‘उपचारांची परिणामकारकता शरणागतीवर, तर ज्ञानाची प्रगल्भता कृतज्ञताभावावर अवलंबून असते.’ चांगला उपचारक होण्यासाठी शरणागती आणि कृतज्ञताभाव दोन्ही आवश्यक आहे.’
– श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |