बनावट कागदपत्रे वापरून पिंपरी पालिकेची फसवणूक करणार्या ठेकेदारांचे रॅकेट उघडकीस !
कारवाई करण्यात टाळाटाळ
पिंपरी – येथील पालिकेची विकासकामे करणार्या ठेकेदारांनी अधिकार्यांच्या साथीने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली असल्याचे रॅकेट उघडकीस झाले आहे. विशेषत: स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अनेक कामांमध्ये संगनमताने असाच प्रकार झाल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते. अनुमाने १०० प्रकरणांमध्ये असे अपप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे; मात्र यासंदर्भात कारवाई करण्यात टाळाटाळ होत आहे.
वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी, तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी ९ मासांपूर्वी आयुक्तांना याविषयीची माहिती एका पत्राद्वारे दिली होती. पालिकेची फसवणूक करणार्यांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली होती; पण कुणावरही अपेक्षित कारवाई झाली नाही.
यावर कामे मिळवतांना बनावट कागदपत्रे वापरल्याची काही प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यादृष्टीने कसून तपासणी करण्यात येत आहे. दोषींवर योग्य कारवाई होईल. यापुढे असे प्रकार होणार नाहीत, यादृष्टीने दक्षता घेतली जाईल, असे शहर अभियंता राजन पाटील यांनी सांगितले.