पूर्णवेळ साधना करण्यासाठी कायमस्वरूपी भारतात परत येण्याची सिद्धता करतांना आलेल्या अनुभूती

पूर्णवेळ साधना करण्यासाठी कायमस्वरूपी भारतात परत येण्याची सिद्धता करतांना आलेल्या अनुभूतींमुळे सर्वकाही श्रीकृष्णाच्या नियोजनानुसार होत असल्याचे जाणवणे

‘श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी अमेरिकेहून गोवा येथील रामनाथी आश्रमामध्ये येण्याची संधी मिळाली. आम्ही भारतात परत येण्याची सिद्धता करतांना आलेल्या अनुभूतींमुळे ‘आम्ही भारतात परतणे, हे श्रीकृष्णाचेच नियोजन होते’, याची आम्हाला जाणीव झाली. ‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळे आम्हाला आलेल्या अनुभूती तूच आमच्याकडून लिहून घे’, अशी तुझ्या चरणकमली आर्त प्रार्थना आहे.

श्री. जितेंद्र धवस

१. ‘माझे अनेक मित्र भारतात परत गेले आहेत; परंतु भारतात जाण्याविषयी तुमच्यात असलेला दृढ निश्‍चय मी त्यांच्यामध्ये पाहिला नाही’, असे मित्राने सांगणे

फेब्रुवारी २०१७ मध्ये आम्ही अमेरिकेत परत गेल्यानंतर आम्ही आमच्या मित्रमंडळींना सांगितले, ‘‘आता आम्ही कायमस्वरूपी भारतात जाण्याचे ठरवले आहे.’’ ही गोष्ट मी माझ्या जवळच्या एका मित्राला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘माझे अनेक मित्र भारतात परत गेले आहेत; परंतु भारतात जाण्याविषयी तुमच्यात असलेला दृढ निश्‍चय मी त्यांच्यामध्ये पाहिला नाही. भारतात परत जाण्याविषयी ते मला सांगतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात काही प्रमाणात अनिश्‍चितता अन् दुःख दडलेले असल्याचे जाणवते; मात्र तुमच्या बोलण्यात निश्‍चितता असून त्यासाठी ठोस कारणही असल्याचे मला जाणवलेे.’’

२. अमेरिकेहून भारतात परत येण्याची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ४ मासांत पूर्ण होणे

फेब्रुवारी २०१७ पर्यंत आम्ही भारतात परत जाण्याविषयी केवळ विचारच करत होतो. प्रत्यक्ष कृतीला आरंभ केला नव्हता. ‘जून २०१७ मध्ये भारतात परतायचे’, असे आम्ही ठरवले असले, तरी घर विकायचे होते आणि घरातील वस्तू अन् चारचाकी जहाजाने घेऊन जायचे कि इथेच विकायचे ? हेही ठरवलेले नव्हते. त्यामुळे एवढ्या अल्प कालावधीत हे सर्व कसे होईल ? असे मला वाटायचे. प्रत्यक्षात या प्रक्रियेला आरंभ केल्यावर प.पू. गुरुदेवांच्या कृपेने सर्वकाही सुरळीतपणे होत गेल्याचे आम्हाला अनुभवता आले.

३. देवाच्या कृपेने घर आणि चारचाकी विकण्याचे सर्वांत मोठे काम सहजरित्या होणे

देवाच्या कृपेने आमचे घर विकण्याचे सर्वांत मोठे काम सहजरित्या झाले. ‘एखाद्या धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीने आमचे घर विकत घ्यावे’, अशी माझी इच्छा होती. आरंभी त्यासाठी काही गिर्‍हाईक आले; मात्र त्यांपैकी कोणीही धार्मिक वृत्तीचा नसल्याने मला त्यांना घर विकण्याची इच्छा होत नव्हती. याविषयी मी स्थानिक दलालाशीही बोलून घेऊन ‘आणखी गिर्‍हाईक येतात का ?’, ते पहाण्यास सांगितले. त्याचबरोबर मी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थनाही करत होतो, ‘हे श्रीकृष्णा, हे घर तुला अपेक्षित अशा व्यक्तीलाच विकले जाऊदे आणि त्यातून मिळालेली रक्कम मला स्वीकारता येऊदे.’ त्यानंतर एका आठवड्याच्या आत आमचे घर विकले गेले. विशेष म्हणजे घर विकत घेणार्‍या व्यक्तीला आमच्या घरात तिळाचे तेल अन् उदबत्ती यांच्या सुगंधाची अनुभूती आली होती. प्रत्यक्षात त्या वेळी आम्ही उदबत्ती लावली नव्हती. त्या व्यक्तीने आमच्या वास्तूतील आध्यात्मिक पैलू आणि घरात रहाणार्‍या व्यक्ती यांविषयी एक सुंदर पत्रही लिहिले होते अन् ती व्यक्ती आमची वास्तू घेण्यास उत्सुक होती. ‘माझ्या मनात या ठिकाणी घर घेण्याचा विचारसुद्धा नव्हता. मी सहजच येथे आलो होतो’, असे त्या व्यक्तीने नंतर मला सांगितले.

त्या व्यक्तीने घर घेण्यासाठी ५ – ६ घरे पाहिली होती; मात्र तिला केवळ आमचेच घर आठवत होते. आमचे घर दक्षिणामुखी असल्यामुळे अन् दक्षिणामुखी घर अशुभ मानले जात असल्यामुळे ते घेण्यासाठी त्याच्या आई-वडिलांचा विरोध होता; मात्र ते घर आध्यात्मिकदृष्ट्या चांगले असल्याचे तिने त्यांना पटवून दिले अन् चांगला मोबदला देऊन ते विकत घेतले. यावरून ‘श्रीकृष्णच सर्वकाही करत असून त्याच्या नियोजनानुसारच सर्व घडत असते’, हे मला शिकायला मिळाले. त्याचप्रमाणे आमची चारचाकी गाडी पहिल्याच व्यक्तीने ती न पहाताच खरेदी केली.

४. बालसाधकांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांची आश्रमात रहायला जाण्याची तीव्र तळमळ दिसून येणे

आम्ही पूर्णवेळ साधक होऊन आश्रमात जाण्यासाठी भारतात जाण्याचे ठरवलेले आमच्या मुलांना (कु. अनिकेत (वय १५ वर्षे) आणि कु. सान्वी (वय ७ वर्षे) यांना) समजले, तेव्हा त्यांना फार आनंद झाला. आम्ही जाण्याची सिद्धता करत असतांना मी कु. सान्वीला सहज म्हटले, ‘‘समजा, आपण आश्रमात रहायला गेलो नाही तर ?’’ आमचे जवळचे नातेवाईक भारतात जाणार असल्याचे ठाऊक असलेली सान्वी क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, ‘‘मी त्यांच्यासमवेत भारतात जाईन. तुम्ही त्यांना मला रामनाथी आश्रमात सोडायला सांगा.’’ भारतात जाण्याविषयी अनिकेतला विचारल्यावर तोही म्हणाला, ‘‘मला आजी-आजोबांकडे रहायचे नाही. आपण केवळ गोव्यातील आश्रमात किंवा आश्रमाच्या जवळपास रहाणार असू, तरच मी येईन.’’ यावरून ‘या बालसाधकांना आश्रमात जाण्याची किती तळमळ आहे’, हे माझ्या लक्षात आले.

आम्ही भारतात कायमस्वरूपी येणार असल्याचे आमच्या आई-वडिलांना सांगितले, तेव्हा श्रीकृष्णाने त्यासंदर्भातील त्यांच्या मनाची सिद्धता आधीच करून घेतली असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही त्यांना केवळ ‘भारतात परत येणार’, असे सांगितले होते. आश्रमाविषयी काहीच सांगितले नव्हते, तरीही त्यांनी आम्हाला ‘‘तुम्ही गोव्याला रहाणार ना ?’’, असे विचारले. माझ्या मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांना काळजी वाटत होती; परंतु श्रीकृष्णाच्या कृपेने सर्व अडथळे दूर झाले. त्यामुळे आमच्या कुटुंबियांनी फार प्रश्‍न विचारले नाहीत.

वरील सर्व अनुभूतींसाठी मी श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. जितेंद्र धवस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जुलै २०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक