महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन
परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
(भाग ६)
लेखाचा भाग ५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430683.html
१. साधना
१ इ. गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व !
१ इ ५. सतत उत्तरदायी साधकांना विचारून शंकांचे निरसन करून साधनेचा पुढचा मार्ग अवलंबा !
सौ. श्वेता क्लार्क : श्री. सागर जोशी काही काळ अमेरिकेत होते. आता ते पुण्यात रहातात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही अमेरिकेहून भारतात आल्यानंतर तुम्हाला काय जाणवले ?
श्री. सागर जोशी : अमेरिका आणि भारत यांत पुष्कळ भेद आहे. मी अमेरिकेत असतांना साधना करणे किंवा काहीतरी चांगले करण्याचा विचार मनात येत असे; परंतु मी तसे न करता उद्यान किंवा इतर ठिकाणी जाणे यांसारख्या भौतिक कृतींत रमलो. भारतात आल्यानंतर माझा नामजप आपोआप होऊ लागला. हाच एक मोठा भेद आहे. येथे आल्यानंतर असे वाटले की, देवाने मला पुन्हा आध्यात्मिक जीवनाकडे आणले. आश्रमात आल्यानंतर माझ्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले. येथे मार्गदर्शन करणार्या साधकांकडून चांगले मार्गदर्शन मिळाले आणि माझ्या शंकांचे निरसन झाले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : सुख हे कनिष्ठ स्तरावरचे असून ते भौतिक किंवा सांसारिक सुखाशी संबंधित असते. साधनेमुळे अनुभवायला येणारा आनंद हा मन आणि बुद्धी यांच्या पलीकडीचा असतो. आपण आनंदावस्थेत असतो, तेव्हा मनात कोणतेच प्रश्न नसतात. आनंदावस्था म्हणजे सत्-चित्-आनंद. या अवस्थेत असतांना आपल्याला आतूनच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. देवाच्या अनुसंधानात असल्यामुळे आपण आनंदावस्थेत असतो. देव सर्वज्ञ आहे. आपण त्याच्या अनुसंधानात राहिल्यामुळे आपल्याला कोणताही ग्रंथ किंवा संकेतस्थळ पहाण्याची आवश्यकता नसते. आपल्याला ते आतूनच मिळते.
श्री. सागर जोशी : पूर्वी मी प.पू. वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंत दामोदर आठवले) यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होतो. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्यानंतर ‘नेमकी कोणती साधना करू ?’, या विवंचनेत होतो. तुम्हाला पाहिल्यावर मला त्यांची (प.पू. वरदानंद भारती यांची) आठवण आली. तुमच्यामध्ये मला ते दिसतात. एकदा मी पू. काळेआजी (सनातन संस्थेच्या ५८ व्या संत पू. विजयालक्ष्मी काळे) यांना सनातन संस्था आणि एस्.एस्.आर्.एफ्. सांगत असलेल्या साधनेविषयी विचारले होते. त्या वेळी त्यांनी ‘गुरुतत्त्व कसे एक असते ?’, याविषयी सांगितले होते. त्यानंतर माझ्या मनात कोणतीही शंका उरली नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : गुरुतत्त्व हे आनंदावस्थेत असते. ते सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असते. सत्-चित्-आनंद हा त्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे आपल्या स्थूल डोळ्यांना गुरु वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपात दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते तत्त्वरूपी एकच असतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. प्रश्न विचारत राहिलो, तर देवाला समजून घेण्यात अनेक जन्म जातील. तसेच प्रत्येक प्रश्नाला एक प्रतिप्रश्न असतोच. त्यामुळे त्या प्रश्नांना अंत नाही. अध्यात्मात ‘का आणि कसे ?’ यांच्या पलीकडे जाऊन सांगितलेली साधना करायची असते. तुम्ही तर ‘काहीही विचारायचे नाही’, या स्थितीला पोचला आहात.
(सर्वांना उद्देशून) ‘आध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येक जण निराळा आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे तुम्ही श्री. सागर यांच्याप्रमाणे करू नका. तुमच्या मनात असलेल्या शंका कार्यशाळेतील उत्तरदायी साधकांना विचारा. त्या उत्तरांनी तुमच्या मनाचे समाधान होणे आवश्यक आहे.
(क्रमशः)
लेखाचा भाग ७ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431304.html